ही धोरणसक्ती मराठी भाषा व संस्कृतीसाठी अन्यायकारक
इचलकरंजी:
पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याचा निर्णय मुलांच्या क्षमतेच्या दृष्टीने अतिशय अव्यवहार्य आहे. तसेच हिंदी भाषेची सक्ती नाही असे म्हणत मागील दाराने ती लादण्याचा प्रयत्न करणे ही विद्यार्थ्यांची गळचेपीच आहे. आपल्या संकुचित राजकीय भूमिका पुढे रेटण्यासाठी अशा पद्धतीने विद्यार्थ्यांचा बळी देण्याचा प्रयत्न योग्य नाही. प्रत्येक भाषा तिची संस्कृती घेऊन विकसित होत असते.एकीकडे गेल्या काही वर्षात मातृभाषा मराठी या विषयात अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर लहान मुलांचे खच्चीकरण करणारा हा निर्णय मराठी समाजासाठी घातक आहे. म्हणूनच या निर्णयाला अनेक मान्यवर शिक्षणतज्ञ, अभ्यासक, विचारवंत, कलावंत विरोध करत आहेत. याचे भान ठेवून आणि लोकशाहीची बूज राखून सरकारने हा धोरण सक्तीचा निर्णय तातडीने मागे घेतला पाहिजे ,असे मत समाजवादी प्रबोधिनीच्या साप्ताहिक चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले. या चर्चासत्रात प्रसाद कुलकर्णी ,शशांक बावचकर, प्रा . रमेश लवटे,अशोक केसरकर, सचिन पाटोळे, दयानंद लिपारे, पांडुरंग पिसे, रणजीत यादव, राजन मुठाणे, नारायण लोटके, शकील मुल्ला, रामचंद्र ठिकणे, श्रेयस लिपारे, शहाजी धस्ते, मनोहर जोशी आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना आदरांजली वाहण्यात आली.
Advt
या चर्चासत्रात या विषयाची विविध अंगाने चर्चा करण्यात आली. त्यातून असे मत पुढे आले की, एकीकडे अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाला याचे श्रेय घ्यायचे आणि दुसरीकडे मराठी भाषा व संस्कृतीवर आक्रमण करायचे हे अत्यंत चुकीचे आहे. लहान मुलाला त्याची मातृभाषा म्हणजे परिसर भाषा सर्वात प्रथम योग्य पद्धतीने शिकवली पाहिजे. कारण ती भाषा त्याचे पुढील संपूर्ण व्यक्तिमत्व संपन्न करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असते. विविध क्षेत्रात मान्यवर असलेल्या बहुतांश व्यक्तींचे शिक्षण हे मातृ भाषेतच झालेले असते.त्यांचा मातृभाषेचा पाया बळकट असतो. पण एकाच वेळी तीन भाषा बालवयातच त्याच्यावर लादल्या गेल्या तर त्याच्या विचार विश्वावर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. लहान मुलांसाठी इंग्रजीच्या सक्तीचे परिणाम दोन्ही भाषा अर्ध्या कच्च्या होण्यात झाला आहे हे दिसून आलेले आहे.अनेक सर्वेक्षणातून सातवी आठवीच्या इयत्तेतील अनेक विद्यार्थ्याना मराठी योग्य पद्धतीने लिहिता, वाचता येत नाही हे स्पष्ट झालेले आहे. पदवीधरांनी नोकरीसाठी केलेल्या मराठी भाषेतील अर्जाची असंख्य चुका असतात हेही दिसून आले आहे.असे असताना ही तिसऱ्या भाषेची आणि त्यात हिंदीची सक्ती अतिशय अव्यवहार्य आहे. मराठी भाषेचे व मराठी संस्कृतीचे मारेकरी होणे टाळण्याची गरज.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







