राजकारण विकासमार्गी हवे ऱ्हासमार्गी नको-समाजवादी प्रबोधिनीच्या साप्ताहिक चर्चासत्रातीला मत.
इचलकरंजी:
राजकारणामधून वैचारिकता ,नैतिकता, मूल्यनिष्ठा आणि जबाबदारीची जाणीव दिवसेंदिवस कमी होत चालली आहे हे आजचे अस्वस्थ वर्तमान आहे. राजकीय व्यवस्था जर पोखरलेली असेल तर त्याचा परिणाम आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अशी सर्वच क्षेत्रे क्षीण होण्यात होत असतो. परिणामी राज्याचा, राष्ट्राचा सर्वांगीण विकासाऐवजी सर्वांगीण ऱ्हासमार्गाने प्रवास सुरू होतो. प्रगतीच्या मार्गावरचा प्रवास सुमारीकरणाकडे वाटचाल करू लागला तर धोरणात बदल करून तो पुन्हा प्रगतीच्या मार्गावर नेता येऊ शकतो. मात्र सुमारीकरणाकडून अतिसुमारीकरणाकडे जर आपला प्रवास सुरू झाला तर तर अधोगती अटळ असते. हे सारे टाळायचे असेल तर सर्वप्रथम राजकीय संस्कृती अधिक प्रगल्भ आणि बळकट करावी लागेल असे मत समाजवादी प्रबोधिनीच्या साप्ताहिक चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले. ” राजकारणाचा अधोमार्ग ” या विषयावर हे चर्चासत्र होते.या चर्चासत्रात प्रसाद कुलकर्णी, अशोक केसरकर, दयानंद लिपारे, पांडुरंग पिसे, शकील मुल्ला, नारायण लोटके, मनोहर जोशी यांनी सहभाग घेतला. प्रारंभी ज्येष्ठ नेते सुधाकरराव मणेरे आणि श्यामसुंदर लड्डा यांना आदरांजली वाहण्यात आली.
या चर्चासत्रात असे मत व्यक्त करण्यात आले की, काही लोकप्रतिनिधींच्या सभागृहातील आणि सभागृहाबाहेरील वर्तन व्यवहाराच्या विकृतीत चिंताजनक पद्धतीने वाढ होत चाललेली आहे. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता यांच्या साट्यालोट्यातून चुकीचे पायंडे पडत आहेत. लोकाभिमुख योग्य कारभाराच्या आधारे जनाधार व्यापक करता येतो हा इतिहास पुसला जात आहे. त्याऐवजी सत्तेच्या माध्यमातून पक्ष विस्ताराचा कार्यक्रम घाऊक पद्धतीने सुरू आहे. राजकारणापासून अर्थकारणापर्यंत सर्व क्षेत्रांमधील सूज आणि बाळसे,अभिमान आणि माज, संस्कृती आणि विकृती यातील फरक समजून घेण्याची गरज आहे. हातांना काम मिळावे, भीक म्हणून नव्हे तर सन्मानाने अन्न मिळवता यावे त्याच्यासोबत निवारा ,शिक्षण, आरोग्य इत्यादी जीवनावश्यक बाबी किमान किमतीत व पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हाव्यात, महागाई कमी असावी, राज्यघटनेने जगण्याचा हक्क दिला आहे तर ते जगणे राज्यकर्त्यांनी सुसह्य करावे अशा माफक अपेक्षा सर्वसामान्य जनतेच्या असतात. मात्र त्याच्या पूर्ततेची पुरेशी हमी प्रस्थापित व्यवस्थेत मिळत नाही हे राजकीय अधोगतीचेच लक्षण आहे. त्यात शक्य तितक्या लवकर बदल होण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वसामान्य जनतेनेही राजकारणाच्या सशक्तिकरणाचा आग्रह धरला पाहिजे. या चर्चासत्रात विविध उदाहरणांसह या विषयाची सविस्तर चर्चा करण्यात आली.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







