इचलकरंजीत मंगळवारी ‘तेंडल्या’ चित्रपटाचा विशेष शो
इचलकरंजी दि.२५ जुलै-
आपल्या मातीतील, वाळवा, शिराळा भागातील युवा कलावंतांनी कष्टपूर्वक निर्मिती केलेल्या ‘तेंडल्या’ या प्रेरणादायी चित्रपटाचा विशेष शो मंगळवार दिनांक २९ जुलै रोजी सायंकाळी ६•३० वाजता येथील फॉर्च्यून मल्टीप्लेक्स येथे आयोजित करण्यात आला आहे. क्रीडा पत्रकार सुनंदन लेले प्रस्तुत आणि सचिन जाधव दिग्दर्शित या चित्रपटाने मानाचे सहा पुरस्कार मिळविले असून त्यामध्ये एक राष्ट्रीय आणि पाच राज्य पुरस्कारांचा समावेश आहे.
Advt
‘तेंडल्या आपल्या दारी’ या उपक्रमाच्या अंतर्गत हा चित्रपट रसिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल व अ. भा. मराठी नाट्य परिषद इचलकरंजी शाखा आणि अश्वमेध मोशन पिक्चर्स यांनी या उपक्रमाचे आयोजन फॉर्च्यून ग्रुपच्या सहकार्याने केले आहे
हा चित्रपट क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या जीवनावर आधारित नाही पण त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन दोन पिढ्यांची गोष्ट यामधून मांडण्यात आली आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या सचिन तेंडुलकरने आपल्या दर्जेदार खेळाने सर्व जगभर आपले आणि आपल्या देशाचे नाव केले. हा इतिहास आपल्या जुन्या पिढीने अनुभवला आहे. या पिढीशी आणि त्यांच्या काळाशी भावबंध जोपासणारा हा चित्रपट स्वतः तेंडुलकर यांनी पाहिला आणि कलाकारांना प्रोत्साहन दिले व त्यांच्या गुणवत्तेचे कौतुक केले आहे.
कोरोना काळामुळे हा चित्रपट जास्ती रसिकांपर्यंत पोहोचू शकला नाही, पण ही दर्जेदार आणि पारितोषिकप्राप्त कलाकृती अधिकाधीक विद्यार्थी आणि रसिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी दिग्दर्शक व निर्मात्यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमास सहकार्य करण्यासाठी इचलकरंजी शहरातील शैक्षणिक आणि क्रीडा संस्था पदाधिकाऱ्यांसाठी सदरचा विशेष शो आयोजित करण्यात आला आहे. निमंत्रित प्रवेशिकेसाठी इच्छुक संस्था प्रतिनिधीनी मनोरंजन मंडळ, दाते मळा, इचलकरंजी येथे संपर्क साधावा असे संयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







