ICHMH51NEWS.IN
9921600800

कथ्थक कलांजली… शास्त्रीय व नियमशास्त्रीय नृत्याचा वेधक कार्यक्रम संपन्न

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कथ्थक कलांजली… शास्त्रीय व नियमशास्त्रीय नृत्याचा वेधक कार्यक्रम संपन्न

इचलकरंजी:
येथील पदन्यास नृत्यकला अकादमी आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल व ॲन्स कमिटी यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे गुरू पौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला शास्त्रीय आणि निमशास्त्रीय नृत्य शैलीतील ‘कथ्थक कलांजली’ हा वेधक आणि रंगतदार कार्यक्रम संपन्न झाला. विविध प्रकारचे ताल, गुरुवंदना, अभंग, इत्यादी रचनांवरील नृत्याच्या कलाविष्कारास रसिकांची छान दाद मिळाली. याप्रसंगी नृत्यवर्गातील वेगवेगळ्या गटातील मुली, युवती आणि महिला विद्यार्थिनी यांनी आपल्या नृत्यरचना सादर केल्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला येथील पं. बाळकृष्णबुवा संगीत साधना मंडळाचे कार्यवाह उमेश कुलकर्णी, मनोरंजन मंडळाचे अध्यक्ष समीर गोवंडे, निवेदिका व लेखिका सौ. चित्कला कुलकर्णी, रोटरी क्लब सेंट्रलचे अध्यक्ष घनश्याम सावलानी, ॲन्स कमिटीच्या चेअरमन सौ. वैशाली लोखंडे व प्रेसिडेंट सौ. कविता सावलानी, इत्यादी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि नटराज प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर पदन्यासच्या नृत्यगुरू सायली होगाडे व ज्योती सांगले उपस्थित होत्या.  याप्रसंगी बोलताना कुलकर्णी यांनी “आजच्या काळात शास्त्रीय नृत्य कलेची आवड आपल्या भागातील मुलींच्यामध्ये रुजविणे आणि शास्त्रीय नृत्याच्या प्रसारासाठी कार्यरत राहणे हे कौतुकास्पद आहे” अशा आशयाचे उदगार काढले. यावेळी प्रेसिडेंट  सावलानी यांनीही शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. सुरुवातीला संचालक संतोष आबाळे यांनी स्वागत केले तर पदन्यासचे अध्यक्ष संजय होगाडे यांनी प्रास्ताविक केले‌.
नृत्य कार्यक्रमाच्या सुरुवातीला गुरुवंदना, गणेश स्तुती, शिव वंदना सादर करण्यात आली. त्यानंतर विशारद करणाऱ्या मुलींनी रासताल सादर केला तर प्रवेशिका प्रथम विद्यार्थिनींनी जगत जननी मा हे भजन सादर केले. नंतर सिद्धी भस्मे हिने त्रिदेवी वंदना सादर केली. विशारद प्रथमच्या विद्यार्थिनींनी होरी तसेच तराणा हे दृत लयीमधील नृत्य सादर केले तर विशारदच्या विद्यार्थिनीनी विठ्ठल भजन सादर केले. यावेळी प्रवेशिका पूर्ण, पहिल्या, दुसऱ्या गटातील विद्यार्थीनींनी त्रिताल सादर केला.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात विद्यार्थिनींनी झपताल, शिवस्तुती, सरस्वती वंदना या रचना सादर केल्या. यावेळी विशारदच्या मुलींनी कालभैरव अष्टकम तसेच तीन तालांची गुंफण असणारे त्रिवट नृत्य सादर केले. विविध परीक्षांच्या विद्यार्थिनींनी यावेळी कथ्थक नृत्यामधील आमद, थाट, तोडे, परण, चक्रधार तोडे असे प्रकार तालबद्धरित्या सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी सादर झालेल्या ‘अवघा रंग एक झाला’ या अभंगावरील सुरेख नृत्याने कार्यक्रमाची सांगता झाली. सर्वच नृत्याविष्कारांमधील मुलींचे भावदर्शन आणि नृत्यास साजेशा वेशभूषेसह सादरीकरणामुळे रसिकांचा छान प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमातील सर्व नृत्यांसाठी सायली होगाडे, ज्योती सांगले, रेश्मा कोंडेकर, सिद्दी भस्मे आणि साक्षी बारवाडे यांनी दिग्दर्शन केले. कार्यक्रमाचे समर्पक असे निवेदन सौ. चित्कला कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमासाठी उत्तम अशी गायन व हार्मोनियम साथ श्रीधर पाटील यांनी केली तर तबला साथ राजू पाटील यांनी केली. उत्कृष्ट ध्वनीव्यवस्था होगाडे जॉबर यांची होती. नेपथ्य व्यवस्था महेश सोलापूरे आणि कपिल पिसे यांनी पाहिली तर शेवटी संचालक सचिन चौधरी यांनी आभार व्यक्त केले. येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमास रसिक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कथ्थक कलांजली कार्यक्रमात कथ्थक नृत्याविष्कार सादर करणा-या विद्यार्थीनी कलाकार

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा