नांदणी मठातील हत्ती परत मिळवण्याचा बैठकीत निर्धार, मूक मोर्चाद्वारे प्रांताना निवेदन
इचलकरंजी:
– नांदणी येथील श्री जिनसेन भट्टारक मठातील माधुरी (महादेवी) हत्ती परत मिळवण्यासाठी आणि जिओ व रिलायन्स कंपनीच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या मागणीसाठी सकल जैन समाज इचलकरंजी व भ. महावीर जयंती उत्सव मंडळाच्या वतीने महावीर जैन भवन, इचलकरंजी येथे बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीनंतर मूक मोर्चा काढून प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नांदणी (ता. शिरोळ) येथील श्री जिनसेन भट्टारक मठ हा सुमारे ७०० वर्षांची ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरा असलेला पवित्र जैन संस्थान असून, माधुरी हत्तीण ही त्या परंपरेचा अविभाज्य भाग आहे. अनेक वर्षांपासून मठामध्ये धार्मिक विधी, उत्सव आणि यात्रांमध्ये तिचा सहभाग असतो. हत्तीणीचा मठाशी केवळ धार्मिकच नव्हे, तर भावनिक आणि सांस्कृतिक संबंध आहे.
मात्र पेटा या संस्थेच्या अहवालावर आधारित चुकीच्या माहितीच्या आधारावर हत्तीणीला वनतारा, जामनगर (गुजरात) येथे स्थलांतरित करण्यात आले. समाजाच्या मते, हा निर्णय एकतर्फी व अपूर्ण माहितीच्या आधारे घेतलेला आहे. शासन आणि न्यायालयाने मठाच्या भूमिकेची, परंपरेची व माधुरीशी असलेल्या जनतेच्या भावनिक नात्याची पूर्ण कल्पना घेतली नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
“माधुरी केवळ एक प्राणी नाही, तर ती लाखो जैन व जैनेत्तर भक्तांची श्रद्धा, परंपरा आणि अस्मिता आहे. तिचे खरे घर, तिचा आधार आणि सुख हे नांदणीच्या मठातच आहे. तिची सेवा करणारे, तिला प्रेम देणारे, तिच्याशी एकात्म झालेल्या भावना – याच ठिकाणी आहेत. वनतारा येथे ती केवळ सुरक्षित असणे पुरेसे नाही, तिचे खरे कल्याण हे तिच्या मूळ स्थळीच शक्य आहे,” असा भावनिक सूर निवेदनात उमटला.
या पार्श्वभूमीवर सरकारने त्वरित हस्तक्षेप करून माधुरी हत्तीणीला श्री जिनसेन भट्टारक मठ नांदणी येथे परत आणण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यापूर्वी झालेल्या बैठकीत उपस्थितानी आपल्या मनोगतात कोणत्याही परिस्थितीत हत्ती परत मिळवण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्याचा निर्धार केला.
बैठकीत आ. राहुल आवाडे यांनी न्यायालयाने वनतारा येथे २ आठवड्याची मुदत हत्तीच्या वास्तव्याबाबत दिलेली आहे,तेथील अहवालानुसार पुढील न्यायालयीन लढाई लढू शकतो व ती लढून कायदेशीर मार्गाने परत आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले, जनरेटा व न्यायालय या दोन्ही पातळीवर लढत असून सरकार आपल्या पाठीशी आहे,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ मिळाली असून ते ही मदत करणार असल्याचे सांगितले.
सौरभ राजू शेट्टी यांनी जनभावनेचा विचार करत हत्ती परत आणण्यास कटिबद्ध असल्याचे सांगत रविवारी नांदणी मठ ते जिल्हाधिकारी कार्यालयात निघणाऱ्या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले.
व्यासपीठावर गुंडाप्पा रोजे,चंद्रकांत पाटील, श्रीकांत चंगेडिया,अनिल बमन्नावर, विजय गिरमल,शशिकला बोरा, महावीर जैन,दिलीप मुथा,शेषराज पाटणी,बाबासो हुपरे, अभिजित पटवा, राजेंद्र माणिकचंद शहा, अजित बाबासाहेब खंजिरे, ओमप्रकाश छाजेड, बाळासाहेब पारीसा चौगुले, बाळासो मलगोंडा पाटील, विकास चौगुले आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी ‘माधुरी बचाव’ स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. तसेच रस्त्यावरचा संघर्ष, कायदेशीर लढाई आणि सरकारदरबारी प्रयत्न अशा सर्व पातळ्यांवर हे आंदोलन उभे राहणार असल्याचे वक्त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी संजय बेडक्याळे,अनिल गडकरी,पद्मश्री पाटील,सनतकुमार नांदणीकर,उमेश पाटील,पंढरीनाथ ठाणेकर,सनत दायमा,वैशाली डोंगरे, शुभम कोथळे,पुरंदर पाटील, चंद्रकांत पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
शेवटी मूक मोर्चा काढून प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी जनभावना शासनाकडे तातडीने पोहोचवण्याचे आश्वासन दिले.
फोटो
प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना निवेदन देताना चंद्रकांत पाटील,बाबासो हुपरे, सौरभ शेट्टी,शेखर शहा,गुंडाप्पा रोजे,शशिकला बोरा व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800










