ICHMH51NEWS.IN
9921600800

छत्रपती शिवरायांविषयी विकृत माहिती देणार्‍या ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटावर बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर येथे निवेदन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

छत्रपती शिवरायांविषयी विकृत माहिती देणार्‍या ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटावर बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर येथे निवेदन

कोल्हापूर – ‘खालिद का शिवाजी’ या आगामी मराठी चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी ऐतिहासिकदृष्ट्या खोटी, तथ्यहीन व विकृत माहिती देऊन समस्त जनतेची दिशाभूल केली आहे. या विकृत प्रचारामुळे समस्त शिवप्रेमींच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. ज्याप्रमाणे ‘‘उदयपूर फाइल्स : कन्हैय्यालाल टेलर मर्डर’’ या चित्रपटामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे त्यावर अंतरिम बंदी आणण्यात आली, त्याचप्रमाणे ‘‘खालिद का शिवाजी’’ या चित्रपटावर देखील बंदी घालण्यात यावी, अशी मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समिती आणि सकल हिंदू समाज यांच्या  वतीने  निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आले.

या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, हिंदू एकता आंदोलनाचे श्री. दिलीप भिवटे, विश्‍व हिंदु परिषदेचे श्री. अशोक रामचंदानी आणि श्री. विजय पाटील, अखिल भारत हिंदू महासभेच्या महिला  आघाडीच्या शीला माने, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे आणि करवीर तालुकाप्रमुख श्री.राजू यादव, महाराज प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, मराठा तितुका मेळवावाचे श्री. योगेश केरकर, मंदिर महासंघाचे श्री. अशोक गुरव, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री किरण दळवी, स्वप्नील घोरपडे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी आणि श्री. महेंद्र अहिरे उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या नावे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या सैन्यात ३५ टक्के मुस्लिम सैनिक होते, महाराजांचे ११ अंगरक्षक मुस्लिम होते, आणि रायगडावर महाराजांनी मशिद बांधली होती, असे आक्षेपार्ह व विकृत दावे करण्यात आले आहेत. हे सर्व दावे भ्रामक, अप्रामाणिक व कोणत्याही ऐतिहासिक पुराव्याविना प्रसारित करण्यात आले आहेत. या चित्रपटात शिवाजी महाराजांना ‘सेक्युलर’ ठरवण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न इतिहासाच्या नावाने समाजात गोंधळ निर्माण करणारा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणतीही जातीय जनगणना नव्हती. अशा परिस्थितीत 35% मुस्लिम सैनिक असल्याचा दावा कोणत्या आधारावर केला जात आहे? असा सवाल समितीने उपस्थित केला आहे. त्यामुळे ‘‘खालिद का शिवाजी’’ हा चित्रपट हिंदू समाजात भ्रम निर्माण करणारा आणि शिवाजी महाराजांचे खोटे चित्रण करणारा आहे. तरी  ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटावर जोपर्यंत त्यातील ऐतिहासिक माहितीचे अधिकृत सत्यापन होत नाही तोपर्यंत बंदी घालण्यात यावी.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा