मुख्यमंत्री ४ वेळा येऊन गेले तरी पाणीप्रश्न का सुटत नाही-शशांक बावचकर
इचलकरंजी:
– भाजप आणि मित्रपक्षांकडुन सत्तेसाठी खोटी आश्वासने दिली जात आहेत. त्यामुळे जनतेने त्या भुलथापांना बळी पडु नये, असे आवाहन करत शिव-शाहु विकास आघाडीचे नेते शशांक बावचकर यांनी केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना आणि मुख्यमंत्री ४ वेळा इचलकरंजीत येऊनही शहराचा पाणी प्रश्न का सुटत नाही ? याचे खासदार, आमदारांनी उत्तर देण्याचे आव्हान केलेे. येथील प्रभाग क्रमांक ११ मधील शिव-शाहु आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या कॉर्नर सभेत ते बोलत होते.
बावचकर यांनी मुलभुत प्रश्न सोडवणे आणि शहराच्या सर्वांगिण विकास करण्यासाठीच लोकप्रतिनिधी निवडुन द्यायचे असतात. मात्र गेल्या ८-१० वर्षात शहरातील पायाभुत सुविधा पुर्ण झाल्या आहेत का?, शहराचा पाणी प्रश्न का सुटत नाही ?, मुलभूत सुविधांसाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले पण प्रत्यक्षात काय स्थिती आहे ?, खराब रस्त्याला जबाबदार कोण?, कोट्यवधी रुपये खर्च करुनही कचरा डेपोवरील कचर्याचा डोंगर जैसे थेच का ? याचा पंचनामा करण्याची हीच वेळ आहे. गेल्या ५ वर्षात मक्तेदारांचे खिसे भरण्याचेच काम झाले आहे. नगरपालिकेची महापालिका झाल्यावर भ्रष्टाचार, टक्केवारी कमी होईल अशी जनतेची आशा होती मात्र प्रशासकीय कारकिर्दीतही प्रचंड भ्रष्टाचार झाला. कोणत्याही विभागात समन्वय नाही. खासदार, आमदारांचा हस्तक्षेप थांबता थांबेनासा झाला आहे. अशा परिस्थितीत महापालिकेत पुन्हा सत्ता मागितली जात आहे पण केंद्रात आणि राज्यात सत्ता असुन आणि मुख्यमंत्री स्वत: ४ वेळा इचलकरंजीत येऊनही शहराचा पाणी प्रश्न का सुटत नाही ? आणि शहराचे मुलभुत प्रश्नही सुटत नसतील तर महापालिका होऊन उपयोग काय ? याचे उत्तर खासदार, आमदारांनी द्यावे. केवळ दिशाभुल करुन, भुलथापा मारुन सत्ता मिळवायची आणि सत्तेवर आल्यावर आश्वासनांकडे दुर्लक्ष केले जात आहे. हे सर्व रोखण्यासाठी, शहराच्या विकासासाठी शिव-शाहु आघाडीच्या उमेदवारांना निवडुन देण्याचे आवाहन केले.
राजर्षी शाहु क्रांती सेनेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी काँग्रेसच्या काळात कधी जातीपातीचे राजकारण झाले नाही पण आता जातीपातीचे राजकारण करुन दिशाभुल केली जात आहे. सत्ताधारी केवळ सत्तेसाठी राजकारण करत आहेत. १० योजना बंद करुन सुरु केलेली लाडकी बहिण योजना फार काळ सुरु राहणार नाही. त्यामुळे भुलथाप्पांना बळी न पडता शिव-शाहु आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.
अभि तळकर यांनी कार्यकर्ताही भागाचा विकास करु शकतो हे कामातून दाखवून दिले आहे. निवडणुकीतून माघारीसाठी दबावतंत्राचा वापर झाला पण दडपशाहीला न जुमानता चारही उमेदवार निवडणुक लढवत असून भविष्यातही भागाचा विकास करण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी महेश वेळु, विशाल कांबळे, प्रभाग १० मधील उमेदवार सरफराज खलिफा, नजीर फकीर, सरुबाई कांबळे, चंद्रभागा तळकर यांनी शहराच्या परिवर्तनासाठी साथ देण्याचे आवाहन केले. सभेस प्रभागातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कॉर्नर सभेत बोलताना शशांक बावचकर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







