पहिल्या इमनपा निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज; १५ जानेवारीला मतदान,१६ ला मतमोजणी-आयुक्त पल्लवी पाटील
इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून, दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार कार्यवाही सुरू आहे. शहरात एकूण १६ प्रभागांसाठी निवडणूक होत असून, ही निवडणूक चार झोन—अ, ब, क आणि ड—निहाय १५ जानेवारी रोजी पार पडणार आहे तर १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त पल्लवी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
निवडणूक निर्णय अधिकारीनिहाय झोनचे विभाजन करण्यात आले असून, झोन अ मध्ये प्रभाग क्रमांक ८, ९, १३, १६, झोन ब मध्ये १०, १२, १४, १५, झोन क मध्ये ४, ५, ६, ११ तर झोन ड मध्ये १, २, ३ आणि ७ या प्रभागांचा समावेश आहे. शहरात एकूण ३०२ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी १७ क्षेत्रीय अधिकारी व ४ राखीव अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. विभागीय कार्यालयांतर्गत ४ FST पथके तीन शिफ्टमध्ये कार्यरत असून, प्रत्येक प्रभागात सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत दोन VST पथके कार्यरत राहणार आहेत. शहरातील चार मुख्य मार्गांवर SST पथके २४ तास व्हिडीओ कॅमेऱ्यांसह तपासणी करीत असून, या ठिकाणी CCTV कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
मतदान केंद्रांच्या संवेदनशीलतेच्या दृष्टीने तपासणी करण्यात आली असून, कायदा व सुव्यवस्था तसेच आर्थिक बाबींच्या अनुषंगाने ७४ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून निश्चित करण्यात आली आहेत. या सर्व ठिकाणी वेबकास्टिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. परदर्शी मतदान केंद्रांची संख्या २८ आहे.
मतदार यादीच्या पडताळणीत शहरात एकूण २,४८,९०७ मतदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आयोगाकडून प्राप्त झालेल्या ८,७९८ संभाव्य दुबार मतदारांपैकी ६,०५४ मतदार दुबार नसल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांची नोंद दुरुस्त करण्यात आली आहे. पडताळणीनंतर १,३७२ मतदार दुबार असल्याचे आढळून आले. यापैकी १,१९९ मतदारांनी स्वयंघोषणापत्र दिले असून, उर्वरित मतदारांच्या नावासमोर दुबार शिक्का मारण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे.
मतदान यंत्रांसाठी स्ट्राँग रूमची २४x७ सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून, सर्व सुरक्षा मानके पूर्ण केली आहेत. CCTV कॅमेरे, अग्निशमन व्यवस्था, स्वच्छता व कीटकनाशक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मतदानासाठी १० टक्के राखीव मशीनसह एकूण ३६७ CU आणि ७१३ BU सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
मतदान केंद्र अधिकारी, कर्मचारी तसेच मतमोजणी कर्मचाऱ्यांचे पहिले व दुसरे प्रशिक्षण पूर्ण झाले असून, तिसरे प्रशिक्षण १४ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. मतमोजणीचे प्रशिक्षण ९ जानेवारी रोजी पार पडले असून, दुसरे प्रशिक्षण १३ जानेवारीला होणार आहे.
साहित्य वितरण १४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता राजीव गांधी भवन येथे झोननिहाय ८ टेबलवरून होणार आहे. मतदानानंतर साहित्य संकलनही याच ठिकाणी करण्यात येणार आहे.
दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार असून, यासाठी ३०२ मतदान केंद्रांवर १,५१० अधिकारी-कर्मचारी व ३०२ पोलीस कर्मचारी नेमण्यात आले आहेत. शहरातील १ ते १६ प्रभागांमध्ये एकूण २३० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
मतदान दिवशी मतदान केंद्रात केवळ मतदान अधिकारी, उमेदवार, त्यांचे अधिकृत प्रतिनिधी व संबंधित मतदारांनाच प्रवेश दिला जाणार असून, कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक उपकरण किंवा मोबाईल फोन नेण्यास बंदी असेल.
मतमोजणीसाठी कापड मार्केटसमोरील राजीव गांधी भवन हे ठिकाण निश्चित करण्यात आले असून, दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून चारही झोनची मतमोजणी एकाचवेळी सुरू होणार आहे. एकूण ३३ टेबलवर १० ते ११ फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. निकाल प्रसिद्धीसाठी डिस्प्ले बोर्ड, स्वतंत्र मीडिया सेल व ओळखपत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
पोलिंग पार्टीसाठी बसेसची व्यवस्था खवरे मार्केट येथे, तर अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी पार्किंग कापड मार्केट व मंगलमूर्ती चित्रमंदिर परिसरात करण्यात आली आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शक व सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती निवडणूक प्रशासनाने दिली आहे.यावेळी उपायुक्त नंदू परळकर,विजय राजापूरे,जनसंपर्क अधिकारी नितीन बनगे उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800









