इचलकरंजीत महायुतीला स्पष्ट बहुमत,शिवशाहू आघाडीस १७ जागा
इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिकेच्या १६ प्रभागांतील एकूण ६५ जागांसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून शहराच्या राजकारणात भाजप महायुतीने स्पष्ट बहुमतासह वर्चस्व प्रस्थापित केले आहे. भाजपला ४३, शिव-शाहू विकास आघाडीला १७, शिंदे गटाच्या शिवसेनेला ३, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला १ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला १ जागा मिळाली आहे.
शिव-शाहू विकास आघाडीचा प्रभाग १ व २ वर दबदबा
प्रभाग क्रमांक १ आणि २ मध्ये शिव-शाहू विकास आघाडीने सर्व जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. प्रभाग १ मध्ये स्वाती राजेंद्र लोखंडे, सचिन लालासो राणे, रूपाली नितीन कोकणे आणि उदयसिंग मारुती पाटील हे चारही उमेदवार विजयी झाले. तसेच प्रभाग २ मध्ये यास्मीन मुसा तासगावे, पद्मा लक्ष्मण सावरतकर, रणजीत गंगाराम जाधव आणि परवेझ लतिफ गैबान यांनी विजय संपादन केला.
भाजपची शहरभर मुसंडी
प्रभाग क्रमांक ३ पासून १६ पर्यंत बहुतांश प्रभागांमध्ये भाजपने मोठ्या फरकाने विजय मिळवला. प्रभाग ६, ९, ११, १२, १४ आणि १५ मध्ये भाजपने सर्व जागांवर निर्विवाद वर्चस्व राखले. प्रभाग १४ मधील अभिषेक रमाकांत वाळवेकर यांनी उच्चांकी मतांनी विजय मिळवत निवडणुकीतील लक्षवेधी यश नोंदवले.
चुरशीच्या लढती आणि महत्त्वाचे निकाल
प्रभाग क्रमांक ३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे अशोक रामचंद्र जांभळे यांनी विजय मिळवला, तर याच प्रभागात शिंदे गटाच्या शिवसेनेच्या सरिता भाऊसो आवळे विजयी ठरल्या. प्रभाग ५ मध्ये शिवसेना (उबाठा) गटाचे शिवाजी संभाजी पाटील यांनी भाजपच्या सुनील पाटील यांचा पराभव केला.
प्रभाग १६ मध्ये शिव-शाहू विकास आघाडीच्या स्मिता संजय तेलनाडे आणि सुनील शंकरराव तेलनाडे यांचा विजय ठरला, त्यामुळे एकाच कुटुंबातील उमेदवारांच्या विजयाची चर्चा शहरात रंगली.
विद्यमान व दिग्गजांचा पराभव
या निवडणुकीत काही विद्यमान नगरसेवकांना पराभवाचा सामना करावा लागला. शिव-शाहू विकास आघाडीचे प्रकाश मोरबाळे, राहुल खंजिरे, संजय कांबळे, अब्राहम आवळे, तसेच भाजपचे किसन शिंदे, सुनील पाटील, संजय केंगार हे पराभूत झाले.
दिग्गजांमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे सुहास जांभळे, भाजपच्या मंगल मुसळे, शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र लोहार यांचा पराभव विशेष चर्चेचा ठरला.
विजयानंतर जल्लोष
निवडणूक निकाल जाहीर होताच भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी शहरात फटाके फोडून, घोषणा देत आणि एकमेकांचे अभिनंदन करत मोठा जल्लोष साजरा केला.
भारतीय जनता पार्टी महायुतीने केलेल्या विकासकामांवर इचलकरंजीच्या जनतेने विश्वास दाखवून भरघोस आशिर्वाद दिले. विश्वासाने जी धुरा जनतेने आमच्या खांद्यावर सोपविली आहे, ती पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबध्द आहोत. इचलकरंजीच्या सर्वांगिण विकासासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही विशेष प्रयत्न करु. विशेषत: शहरावासियांच्या जिव्हाळ्याच्या पिण्याच्या पाण्याचा जटील प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी आमची असेल. या निवडणूक प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधाला विरोध करत नेहमीप्रमाणे आरोपांच्या फैर्या झाडल्या. परंतु जनतेने त्याला बळी न पडता मतदानाच्या रुपातून विरोधकांनी त्यांची जागा दाखवून दिली आहे. महानगरपालिकेत भाजपाचा महापौर असेल आणि जनतेचा विकास केला जाईल. –
आमदार राहुल आवाडे
इचलकरंजी महानगरपालिका झाल्यानंतर पहिल्या निवडणुकीत, भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष महायुतीच्या हातात स्पष्ट बहुमताने इचलकरंजी महानगरपालिकेचे सत्तासूत्रे देऊन जो विश्वास दाखवला आहे तो अतुलनीय आहे.
आधी जनसंघ, व नंतर 30 वर्षांपूर्वी, एक-दोन नगरसेवकांसह इचलकरंजीत सुरू झालेला भारतीय जनता पार्टीचा प्रवास आज पूर्ण बहुमतापर्यंत आला आहे, हा एक ऐतिहासिक टप्पा आहे. हा विजय कार्यकर्त्यांना समर्पित आहे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करून विजयश्री खेचून आणला आहे. आता या महाविजयाचे रूपांतर आम्हाला इचलकरंजीतील नागरिकांच्या महासेवेत करायचे आहे.
याच समन्वयाने इचलकरंजीचे प्रलंबित प्रश्न सोडवू. केंद्रात आणि राज्यात असलेल्या डबल इंजिन ला इचलकरंजीचे तिसरे इंजिन जोडले गेले आहे. जाहीरनाम्यात दिलेले आश्वासने पूर्ण करत येत्या पाच वर्षात इचलकरंजीचा कायापालट घडवू
– सुरेश हाळवणकर – प्रदेश उपाध्यक्ष तथा निवडणूक प्रमुख इचलकरंजी महानगरपालिका
उदयसिंग पाटील निवडून आल्यावर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
शहरात कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला
मदन कारंडे व रणजित जाधव निवडून आल्यावरचा क्षण
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800










