मुख्य कार्यकारी अधिकारी विरोधात गायकवाड कुटुंबियांचे १९ रोजी ‘भिक मागो’ आंदोलन.
व्हिडीओ https://youtube.com/shorts/VyIaHcdnkiw?si=EyX7Lq8P1xRenEYv
तिळवणी:
तिळवणी येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड हे सोमवार, दिनांक १९ जानेवारी रोजी सहकुटुंब ‘भिक मागो’ आंदोलन करणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या विरोधात हे आंदोलन असून, याबाबतची माहिती गायकवाड यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
गायकवाड यांचा प्लॉट गावचे सरपंच राजेश बाबासाहेब पाटील यांच्या घरगड्याच्या नावावर ग्रामसेविका सुजाता कुमार कांबळे यांनी नोंदवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणी अनेक वेळा आंदोलने करूनही मुख्य कार्यकारी अधिकारी कोणतीही कारवाई करत नसल्याचा दावा गायकवाड यांनी केला आहे.
मागास समाजावर अन्याय केला जात असल्याचा आरोप करत, संविधानाची अंमलबजावणी करताना पक्षपातीपणा होत असल्याचे गायकवाड यांनी नमूद केले. आम्ही मागासवर्गीय असल्यानेच मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. जातीय भूमिकेतून आमच्यावर अन्याय करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
तसेच ग्रामसेवक, सरपंच, सदस्य, तंटामुक्ती समिती, पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना अर्थपूर्ण वाटाघाटींच्या नावाखाली वाचवले जात असल्याचा आरोपही पत्रकात करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर दसरा चौक ते जिल्हा परिषद कार्यालयापर्यंत ‘भिक मागो’ आंदोलन करण्यात येणार असून, आंदोलनादरम्यान जमा झालेली भीक मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांना देऊन आमच्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा पुन्हा एकदा वाचण्यात येणार असल्याचे सुनील गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







