इचलकरंजी महापालिकेत महापौर उदय धातूंडे उपमहापौर अनिल डाळ्या यांनी स्वीकारला पदभार
इचलकरंजी:
येथील इचलकरंजी महानगरपालिकेच्या महापौरपदी उदय धातुंडे आणि उपमहापौरपदी अनिल डाळ्या यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज महायुतीचे नेते व नगरसेवकांच्या उपस्थितीत दोघांनी पदभार स्वीकारला. यावेळी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही महापौर व उपमहापौरांनी दिली.
महापौर उदय धातुंडे यांनी पदभार स्वीकारताना आमदार राहुल आवाडे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे, गटनेते विठ्ठल चोपडे, आयुक्त पल्लवी पाटील, भगतराम छाबडा, सुनील पाटील, प्रकाश दत्तवाडे, बाळासाहेब कलागते आदी मान्यवर उपस्थित होते. तर उपमहापौर अनिल डाळ्या यांनी पदभार स्वीकारताना त्यांचे वडील देवकरण डाळ्या, मातोश्री शांतीदेवी डाळ्या, सतीष पंडित, अरविंद शर्मा, शहाजी भोसले, अरुण कुंभार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
पदभार स्वीकारल्यानंतर महापौर उदय धातुंडे म्हणाले की, शहराच्या जिव्हाळ्याच्या सुळकुड पाणी योजनेबाबत आमदार राहुल आवाडे यांच्या सूचनेनुसार ती पूर्ण करण्यासाठी योग्य ती कार्यवाही केली जाईल. लवकरच शहरवासीयांना एक ते दोन दिवस आड पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. नागरिकांची रखडलेली कामे मार्गी लावणे, आमदार राहुल आवाडे यांच्या माध्यमातून मिळालेला निधी योग्य पद्धतीने खर्च करून विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे, यावर भर राहील. शहरातील स्वच्छता व कचरा उठाव सुधारण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जातील. यासाठी लवकरच आरोग्य विभागाची बैठक घेतली जाईल. तसेच पंचगंगा नदीचे प्रदूषण थांबवण्यासाठी आवश्यक तेव्हा कठोर पावले उचलून नदी प्रदूषणमुक्त करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
उपमहापौर अनिल डाळ्या म्हणाले की, महापालिकेच्या ई-बस सेवेमधून महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत बससेवा मिळावी यासाठी पाठपुरावा केला जाईल. आमदार राहुल आवाडे यांच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी मोठा निधी आणण्याचा प्रयत्न राहील. भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येतील. शहरातील सार्वजनिक मुताऱ्यांची दुरवस्था दूर करून त्यांची सुधारणा केली जाईल. तसेच लहान-मोठ्या बागा विकसित करणे आणि शहरातील प्रमुख रस्ते धुळमुक्त करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








