२१ व २२ फेब्रुवारी रोजी टॅफनॅपचे राज्य अधिवेशन पुण्यात
पुणे:
दि. २१ व २२ फेब्रुवारी २०२६ रोजी स्वयंसहायित विनाअनुदानित तंत्रशिक्षण संस्थांमधील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांची संघटना टॅफनॅप यांचे राज्यस्तरीय अधिवेशन कोथरूड येथील डॉ. जे. पी. नाईक सभागृह, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. शनिवार, दि. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.०० वाजता अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे.
उद्घाटन समारंभास प्रा. एस. पी. लवांदे (अध्यक्ष, एम. फुक्टो), श्री. विवेक वेलणकर (सजग नागरिक मंच), प्रा. राजेंद्र ढवळे (अध्यक्ष, टॅफनॅप), प्रा. सचिन शिंदे (सिंहगड समन्वय समिती), प्रा. सुभाष पतके (ज्येष्ठ टॅफनॅप सदस्य) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
अधिवेशनातील विविध सत्रांत प्रख्यात व्हिसल ब्लोअर के. व्ही. जे. राव, प्रसिद्ध वक्ते व लेखक तसेच सनय छत्रपती शासन पक्षाचे संस्थापक श्री. नामदेवराव जाधव, नागपूर येथील ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. अशोक रघुते, सामाजिक कार्यकर्ते अॅड. सिद्धार्थ इंगळे (मुंबई), डोंबिवली येथील पेंढारकर कॉलेजवर प्रशासक नेमणुकीचा लढा यशस्वी करणारे श्री. सोनू सुरवसे, माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. विवेक वेलणकर, प्रा. राम यादव, प्रा. शंतनू काळे, प्रा. डॉ. सुभाष आठवले, डॉ. अपर्णाताई खाडे, प्रा. गोविंद वाघमारे (अध्यक्ष, मुक्ता संघटना) आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
शिक्षण शुल्क निर्धारण समितीच्या अकार्यक्षमतेमुळे स्वयंसहायित विनाअनुदानित तंत्रशिक्षण संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा मुद्दा अधिवेशनात केंद्रस्थानी राहणार आहे. शिक्षण शुल्क ठरविण्यासाठी समितीकडे सादर केलेल्या प्रस्तावांची प्रत सर्व प्रपत्रांसह संस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बंधनकारक असतानाही बहुतांश संस्था हा नियम पाळत नसल्याचा आरोप आहे. यासंदर्भातील तक्रारींना दखल न घेतल्याने समितीच्या निष्क्रियतेविरोधात आंदोलन उभारण्याचा निर्णय या अधिवेशनात अपेक्षित आहे.
याशिवाय दिले-घेते पद्धतीने वेतन देऊन कर्मचाऱ्यांची होणारी आर्थिक व मानसिक पिळवणूक, बोगस प्राध्यापक दाखवून शासन व समाजाची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर कारवाई करण्यात अपयशी ठरणाऱ्या शासकीय यंत्रणा, थकीत वेतनाचा गंभीर प्रश्न, तसेच गुणवत्तेत वाढ न होता केवळ संख्यात्मक वाढीमुळे रसातळाला गेलेली महाराष्ट्रातील तंत्रशिक्षण व्यवस्था अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. या प्रश्नांवर आंदोलन तसेच जनहित याचिका दाखल करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
टॅफनॅपच्या या दोन दिवसीय अधिवेशनात स्वयंसहायित विनाअनुदानित तंत्रशिक्षण संस्थांमधील सर्व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन टॅफनॅपचे सचिव प्रा. श्रीधर वैद्य यांनी केले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







