महाशिवरात्री व जोतिबा खेटानिमित्त इचलकरंजी आगाराकडून जादा बसफेऱ्यांचे नियोजन
इचलकरंजी:
महाशिवरात्री तसेच जोतिबा दुसरा खेटा या धार्मिक पर्वाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या इचलकरंजी आगारामार्फत रविवार, दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी विशेष जादा बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
इचलकरंजी आगारातून इचलकरंजी–खिद्रापूर या मार्गावर नियमित बसफेऱ्या सकाळी ०७.४५, १०.००, ११.३०, १३.३०, १४.३०, १६.३०, १८.१५ व २०.०५ वाजता उपलब्ध राहणार आहेत. यासोबतच भाविक व प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार अतिरिक्त बसेस देखील सोडण्यात येणार असल्याची माहिती आगार प्रशासनाने दिली आहे.
तसेच इचलकरंजी–जोतिबा या मार्गावर खास भाविकांसाठी एकूण ०५ जादा बसेसचे नियोजन करण्यात आले असून, त्यामुळे जोतिबा खेट्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. याशिवाय इचलकरंजी–भीमाशंकर, इचलकरंजी–मार्लेश्वर, गणपतीपुळे तसेच अन्य धार्मिक स्थळांवर जाण्यासाठी इच्छुक प्रवासी गट बुकिंगद्वारे बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या सर्व प्रवास व्यवस्थेत महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी लागू असलेल्या सर्व शासकीय रा.प. सवलती दिल्या जाणार असल्याचेही आगार प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महाशिवरात्री व जोतिबा खेटानिमित्त प्रवास करणाऱ्या इचलकरंजी व पंचक्रोशीतील प्रवासी नागरिकांनी या विशेष बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य परिवहन इचलकरंजी आगाराचे आगार व्यवस्थापक श्री. सागर पाटील यांनी केले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







