ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत स्किल वर्कर व प्लेसमेंट सेंटर उभारणीचा प्रस्ताव; पहिली बैठक उत्साहात

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत स्किल वर्कर व प्लेसमेंट सेंटर उभारणीचा प्रस्ताव; पहिली बैठक उत्साहात

इचलकरंजी :
इचलकरंजीतील यंत्रमाग उद्योगासाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने “स्किल वर्कर अ‍ॅन्ड प्लेसमेंट (सेंटर ऑफ एक्सलन्स)” मॉडेल उभारण्यासंदर्भातील पहिली बैठक इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशन येथे पार पडली. या बैठकीला नागपूरचे वस्त्रोद्योग आयुक्त संजय दैने, सहआयुक्त गणेश वंडकर तसेच प्रादेशिक उपायुक्त उज्वला पळसकर उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत करताना इचलकरंजी व परिसरातील यंत्रमाग उद्योग झपाट्याने वाढत असला तरी कुशल मनुष्यबळाची मोठी कमतरता भासत असल्याचे स्पष्ट केले. विव्हर, बिमगेटर, फिटर, हेल्पर, मास्टर, क्लॉथ चेकर, फोल्डर, मेंटेनन्स कर्मचारी तसेच साद्या मागावरील विव्हर व जॉबर यांसारख्या पदांसाठी स्थानिक पातळीवर प्रशिक्षित कामगार उपलब्ध नसल्याने उद्योग मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगारांवर अवलंबून असल्याचे त्यांनी नमूद केले.
स्थानिक तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी शहरात स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र सुरू करणे आवश्यक असून प्रशिक्षण काळात मानधन व वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच हे केंद्र सुरू करण्यासाठी पॉवरलुम असोसिएशन पुढाकार घेणार असून ही योजना यशस्वी करण्याचा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
यानंतर वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, उपाध्यक्ष रफिक खानापूरे आणि संचालक सतीश कोष्टी यांनीही आपली मते मांडली.
वस्त्रोद्योग आयुक्त संजय दैने यांनी इचलकरंजी व सोलापूर येथील असोसिएशनने प्रशिक्षण केंद्राबाबत सविस्तर प्रस्ताव तयार करून वस्त्रोद्योग कार्यालयाकडे पाठवावा, असे सुचविले. तसेच अमरावती येथील टेक्सटाईल पार्कमधील प्रशिक्षण केंद्राला भेट देऊन माहिती घेण्याचे मार्गदर्शन केले. अशा प्रकारचे केंद्र इचलकरंजीत सुरू करण्यास राज्य शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला पॉवरलुम असोसिएशनचे संचालक सोमाण्णा वाळकुंजे, चंद्रकांत भोपळे, पांडुरंग सोलगे, दत्तात्रय टेके, किरण पोवार, राजाराम गिरी, डी.के.टी.ई.चे प्राध्यापक सागर जावळे, विविध स्पिनिंग मिल्सचे प्रतिनिधी तसेच सोलापूर गारमेंट असोसिएशनचे पदाधिकारी व उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत बोलताना चंद्रकांत पाटील
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा