१३ वर्षांपासून मजुरीवाढ नाही; खर्चीवाल्या यंत्रमागधारकांचा संताप, आज मेळावा
इचलकरंजी :
इचलकरंजी व परिसरातील खर्चीवाल्या (मजुरीवर कापड विणणाऱ्या) यंत्रमागधारकांचा महत्त्वपूर्ण मेळावा आज गुरुवार, दि. ७ मे २०२६ रोजी दुपारी ४.३० वाजता दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
२०१३ सालच्या यंत्रमाग कामगार आंदोलनानंतर गेल्या १३ वर्षांपासून ट्रेडिंग असोसिएशनकडून खर्चीवाल्या यंत्रमागधारकांना कोणतीही मजुरीवाढ देण्यात आलेली नसल्याचा आरोप असोसिएशनने केला आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात कामगारांना महागाई भत्त्यावर आधारित पिस रेटनुसार मजुरीवाढ जाहीर होत असली, तरी त्याच प्रमाणात यंत्रमागधारकांना दरवाढ मिळत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.
पूर्वीच्या प्रथेप्रमाणे कामगारांच्या मजुरीवाढीच्या तिप्पट वाढ यंत्रमागधारकांना मिळत होती. मात्र २०१३ पासून ही पद्धत पूर्णपणे बंद झाली आहे. दरम्यान, कामगारांचा पगार, वीजबिल, मिलस्टोअर्स (सुटे भाग), हमाली, वहनखर्च आदी सर्व बाबींमध्ये मोठी वाढ झाल्याने खर्चीवाल्या यंत्रमागधारकांची आर्थिक कोंडी झाली आहे.
या पार्श्वभूमीवर दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनने यापूर्वीही विविध आंदोलने केली, मात्र ट्रेडिंग असोसिएशन बैठकीस उपस्थित राहत नसल्याने प्रश्न प्रलंबितच राहिला आहे. त्यामुळे यंत्रमागधारकांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून अनेक कुटुंबांना कारखान्यातील कामावरच अवलंबून राहून संसार चालवावा लागत आहे.
या सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यास सर्व प्रकारच्या क्वालिटी काढणाऱ्या खर्चीवाल्या यंत्रमागधारकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

