गणेशोत्सवापूर्वी पोलिसांचा ‘ॲक्शन मोड’; १६० गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई!
इचलकरंजी : प्रतिनिधी
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी इचलकरंजी उपविभागीय पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाईची विशेष मोहीम राबविली. या मोहिमेत इचलकरंजी उपविभागातील पाच पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील तब्बल १६० रेकॉर्डवरील आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल सो. व अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या सूचनेनुसार ही विशेष मोहीम राबविण्यात आली. गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालणे, रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या वर्तनात सुधारणा घडवून आणणे तसेच आगामी गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश होता.
इचलकरंजी उपविभागातील इचलकरंजी, शिवाजीनगर, शहापूर, हुपरी आणि कुरुंदवाड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील रेकॉर्डवरील आरोपींची माहिती संकलित करण्यात आली. त्यामध्ये मोक्का गुन्ह्यांतील आरोपी, हद्दपारीचा कालावधी संपलेले आरोपी, दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेले आरोपी, आर्म्स ॲक्टअंतर्गत गुन्ह्यांतील आरोपी तसेच वॉरंटमधील आरोपींचा समावेश होता.
या कारवाईत शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील ५०, इचलकरंजी ३८, शहापूर ३४, कुरुंदवाड १९ आणि हुपरी येथील १९, अशा एकूण १६० आरोपींना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.
आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने संबंधित आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांच्याकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यात आले. तसेच भविष्यात कोणत्याही प्रकारचे गुन्हेगारी कृत्य करू नये, कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घ्यावी आणि सामाजिक शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, अशा सूचना देण्यात आल्या.
विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या समक्ष सर्व आरोपींना हजर करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपींकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यात आले.
या विशेष मोहिमेमुळे आगामी सण-उत्सवाच्या काळात रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलिसांचे लक्ष राहणार असून, गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यास मदत होणार आहे.
या कारवाईत इचलकरंजी उपविभागातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, पोलीस निरीक्षक महेश चव्हाण, पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, पोलीस निरीक्षक सत्यवान हाके आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड तसेच संबंधित पोलीस ठाण्यांतील गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार सहभागी झाले.
“गुन्हेगारी वर्तनात सुधारणा करून कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी घ्यावी आणि सामाजिक स्वास्थ्य राखावे,” अशा स्पष्ट सूचना उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांना दिल्या.
रेकॉर्डवरील आरोपींना सूचना देताना डीवायएसपी विक्रांत गायकवाड
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







