इचलकरंजीत ईद-ए-मिलादनिमित्त भव्य सद्भावना रॅली; हजारो मुस्लिम बांधवांचा सहभाग
इचलकरंजी/प्रतिनिधी : हजरत मोहम्मद पैगंबर यांनी जगाला शांतता, बंधुभाव आणि सदाचाराचा मार्ग दाखविला. त्यांच्या शिकवणीचे अनुकरण केल्यास संपूर्ण जगात सुख, शांतता आणि सुव्यवस्था नांदू शकते. वस्त्रनगरी इचलकरंजीत हिंदू-मुस्लिमांसह सर्व समाजबांधव सलोख्याने राहत असून, देशाची सर्वधर्मसमभावाची संस्कृती जपत यापुढेही सर्वांनी गुण्या-गोविंदाने राहावे, असे आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महासंचालक रंजनकुमार शर्मा यांनी केले.
ईद-ए-मिलाद अर्थात हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त इचलकरंजीत चिस्तिया मस्जिद सुन्नत जमात इंदिरानगर, मीनाइया मस्जिद कलानगर, सुन्नी कुरेशी मस्जिद कोल्हापूर रोड, गरीब नवाज मस्जिद कृष्णानगर तसेच समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने बुधवारी भव्य सद्भावना रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. इंदिरानगर येथे पोलिस महासंचालक रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
रॅलीच्या प्रारंभी देशाची शान असलेला तिरंगा तसेच मुस्लिम बांधवांचे पवित्र स्थळ मक्का-मदिना यांच्या प्रतिकृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रॅलीत ज्येष्ठ नागरिक, युवक, महिला तसेच लहान बालकांसह हजारो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. घोडे, उंट आणि आकर्षक रथांचा समावेश असलेल्या या शोभायात्रेमुळे शहरातील वातावरण उत्साहपूर्ण झाले होते. ‘सारे जहाँ से अच्छा हिंदुस्ता हमारा’ या देशभक्तीपर गीताने रॅलीतील वातावरण देशभक्तीने भारावून गेले.
इंदिरानगर येथून सुरू झालेली सद्भावना रॅली थोरात चौक, कॉ. मलाबादे चौक, महात्मा गांधी पुतळा, राजवाडा चौक मार्गे गावभागातील हजरत सय्यद मख्तुम वली दर्गाह येथे पोहोचली. तेथे दुवा पठण करून रॅलीची सांगता करण्यात आली.
यावेळी अपर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलिस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, पोलिस निरीक्षक शरद मेमाणे, महेश चव्हाण, गजेंद्र लोहार, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सपोनि विकास शिंदे आदी उपस्थित होते.
शहर व परिसरात वाढत्या अमली पदार्थांच्या वापराच्या पार्श्वभूमीवर झाकीर हुसेन तरुण मंडळाच्या वतीने ‘से नो ड्रग्ज’, ‘जस्ट से नो ड्रग्ज’, ‘अंमली पदार्थांपासून दूर रहा’ असा संदेश देणारा फलक रॅलीत ठेवण्यात आला होता. या माध्यमातून युवकांनी अमली पदार्थांपासून दूर राहण्याचा संदेश देण्यात आला.
दरम्यान, पैगंबर जयंतीनिमित्त आयोजित महाप्रसादही सामाजिक सलोख्याचा संदेश देणारा ठरला. सध्या सुरू असलेल्या श्रावण महिन्याचा विचार करून महाप्रसादामध्ये मांसाहार टाळून शाकाहारी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
रॅलीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच गरजू नागरिकांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यामुळे धार्मिक उत्सवासोबत सामाजिक बांधिलकीही जपण्यात आली.
कार्यक्रमाचे स्वागत अजीज खान यांनी केले, तर प्रास्ताविक सलीम आत्तार यांनी केले. जब्बार झारे यांनी आभार मानले. रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी रियाज सपसागर, बशीर करडी, इफ्तेखार मुल्ला, मुश्ताक जमादार, दस्तगीर आत्तार, शाकिरअली खान, मोहम्मदअली खान, शकील खान, मुबीन बेपारी, कय्युम शेख, महमंद मकानदार, अल्लाबक्ष लक्षमेश्वर, ताजअहमद लक्षमेश्वर, फजलुल्ला शेख, अब्दुलमजीद खुदावंत यांच्यासह डॉ. झाकीर हुसेन तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
ईद-ए-मिलादच्या निमित्ताने निघालेल्या या सद्भावना रॅलीतून धार्मिक श्रद्धेसोबतच सामाजिक एकोपा, राष्ट्रीय एकात्मता, अमली पदार्थविरोधी जनजागृती आणि गरजूंच्या मदतीचा संदेश देण्यात आला.
रॅलीत सहभागी मुस्लिम समाजबांधव
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







