अनंत चतुर्दशी मिरवणुकीत मधमाशांचा हल्ला
इचलकरंजी : अनंत चतुर्दशीच्या गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान पंचगंगा नदी पुलावर अचानक मधमाशांचे मोहोळ उठल्याने गणेशभक्तांसह पोलिसांची मोठी तारांबळ उडाली. मिरवणुकीसाठी पुलावर मोठी गर्दी झाली असताना अचानक मधमाशांनी हल्ला केल्याने नागरिकांनी बचावासाठी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. काही गणेशभक्त व पोलिस कर्मचारी मधमाशांपासून बचाव करण्यासाठी पुलावरून पळताना दिसून आले. या घटनेमुळे काही काळ मिरवणुकीत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, मधमाशांपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी मिळेल त्या दिशेने धाव घेतली. या घटनेचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, गणेश विसर्जन मिरवणुकीतील या अनपेक्षित घटनेची शहरात चर्चा सुरू आहे.




