घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारी पुन्हा बदलली; कचरा प्रश्न सुटणार कधी?
इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न कायम असतानाच प्रशासनाने या विभागाच्या जबाबदारीत पुन्हा बदल केला आहे. गेल्या काही काळात आरोग्य अधिकारी व घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये वारंवार बदल झाले. मात्र शहरातील कचरा संकलन, वाहतूक आणि व्यवस्थापनाचा प्रश्न अपेक्षित पातळीवर मार्गी लागलेला नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
महानगरपालिकेने ३० सप्टेंबर २०२६ रोजी काढलेल्या आदेशानुसार सहायक आयुक्त रोशनी गोडे यांच्याकडे विभागप्रमुख, घनकचरा व्यवस्थापन विभागाची पूर्णवेळ जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे या विभागाच्या कामकाजात आता सातत्य आणि प्रभावीपणा येणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
यापूर्वी आरोग्य अधिकारी पदावर तीन ते चार अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्याची चर्चा असून, जबाबदारीतील या बदलांनंतरही घनकचरा व्यवस्थापनातील मूलभूत समस्या कायम आहेत. डॉ. सुनीलदत्त संगेवार यांच्याकडून आरोग्य अधिकारी पदाचा पदभार काढून घेतल्यानंतर नव्याने नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांकडूनही अपेक्षित परिणाम साधला गेला का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, सहायक आयुक्त संतोष जिरगे यांच्याकडे प्रभाग समिती कार्यालय ‘अ’ व ‘ब’चे सहायक आयुक्त म्हणून जबाबदारी देण्यात आली असून, मध्यवर्ती भांडार, विधी व उद्यान विभागाच्या पर्यवेक्षणाची जबाबदारीही सोपविण्यात आली आहे.
वारंवार बदलांमुळे व्यवस्थापनात सातत्याचा अभाव
घनकचरा व्यवस्थापन प्रभावीपणे राबविण्यासाठी सातत्यपूर्ण नियोजन, पुरेसे मनुष्यबळ, वाहनांची उपलब्धता, साधनसामग्री आणि अधिकाऱ्यांना आवश्यक अधिकार मिळणे गरजेचे आहे. मात्र वारंवार अधिकारी बदलल्याने व्यवस्थापनात सातत्य राहत नसल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.
अधिकारी काम करण्यास सक्षम नसतील तर त्यांची नियुक्ती का केली जाते आणि सक्षम अधिकारी असतील तर त्यांना आवश्यक अधिकार व प्रशासकीय सहकार्य मिळते का, याचे उत्तर प्रशासनाने देण्याची गरज आहे.
त्यामुळे केवळ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या बदलण्याऐवजी घनकचरा व्यवस्थापनासाठी कायमस्वरूपी सक्षम यंत्रणा उभी करून तिची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. नवीन जबाबदारीनंतर शहरातील कचरा व्यवस्थापनात प्रत्यक्ष सुधारणा होणार का, याकडे आता इचलकरंजीकरांचे लक्ष लागले आहे.


