इचलकरंजीत चोरीच्या संशयावरून २१ वर्षीय तरुण पोलिसांच्या ताब्यात,लिंबू चौकातील पानटपरीच्या आडोशाला अंधारात लपून बसल्याचे उघड
इचलकरंजी : शहरातील लिंबू चौक परिसरात मध्यरात्री पानटपरीच्या आडोशाला तोंडाला रुमाल बांधून संशयास्पदरीत्या लपून बसलेल्या २१ वर्षीय तरुणाला शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रेम सागर आदेंद्रा (वय २१, रा. भाग्यरेखा टॉकीजसमोर, कामगार चाळ, इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास लिंबू चौक परिसरात पानटपरीच्या आडोशाला अंधारात तोंडाला रुमाल बांधून एक तरुण लपून बसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याच्या संशयास्पद हालचालींमुळे तो चोरी करण्याच्या उद्देशाने तेथे थांबला असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल तुषार सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार अनिल चव्हाण करीत आहेत.




