ICHMH51NEWS.IN
9921600800

शिवतीर्थ ते गांधी पुतळा मार्ग दिवाळीत उजळणार! महापालिकेतर्फे आकर्षक विद्युत रोषणाई; छोट्या व्यापाऱ्यांच्या सहकार्यामुळे मार्ग मोकळा : महापौर उदय धातुंडे

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शिवतीर्थ ते गांधी पुतळा मार्ग दिवाळीत उजळणार!

महापालिकेतर्फे आकर्षक विद्युत रोषणाई; छोट्या व्यापाऱ्यांच्या सहकार्यामुळे मार्ग मोकळा : महापौर उदय धातुंडे

इचलकरंजी : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वस्त्रनगरीच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी महापालिकेतर्फे शिवतीर्थ ते महात्मा गांधी पुतळा चौक या प्रमुख मार्गावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. रस्त्याच्या दुतर्फा विद्युत दिव्यांची सजावट तसेच विविध ठिकाणी आकाशदिवे लावण्यात येणार आहेत. छोट्या व्यापाऱ्यांनी पर्यायी जागेवर व्यवसाय करण्यास सहकार्य केल्यामुळे हा उपक्रम शक्य होत असल्याची माहिती महापौर उदय धातुंडे यांनी दिली.

दरवर्षी दिवाळीनिमित्त शहरातील मुख्य रस्त्यावर मोठा बाजार भरतो. यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. मात्र, मुख्य रस्त्यावरील दिवाळी बाजार अन्यत्र हलविण्याबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे यंदा बाजाराच्या जागेचा प्रश्न निर्माण झाला होता. यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने व्यापाऱ्यांशी चर्चा करून थोरात चौकासह अन्य पर्यायी ठिकाणी बाजार भरविण्याचे आवाहन केले. व्यापाऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला.

या पार्श्वभूमीवर शिवतीर्थ ते गांधी पुतळा मार्गावर रोषणाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यांनाही विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे.

दरम्यान, रोषणाईसाठी आवश्यक विद्युत खांब उभारण्याचे काम सुरू झाले आहे. स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, प्रभाग समिती सभापती सुशांत कलागते व नगरसेवक नितेश पोवार यांनी कामाची पाहणी केली. नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी या उपक्रमास सहकार्य करून दिवाळीचा आनंद घ्यावा, असे आवाहन सतीश मुळीक यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा