मतभेदांमुळे मतदानावर परिणाम करू नका,उस्फुर्त मतदान करा-डॉ उदय निरगुडकर
इचलकरंजी :
एकीकडे लव जिहाद व लँड जिहाद हा देशासाठी धोकादायक बनला असून आता वोट जिहाद देशात पेरला जात आहे. तर दुसरीकडे मतभेद व गाफील राहिल्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी येत आहे. मतदानाची आकडेवारी ही जिवंत माणसाची कादंबरी असून या आकड्यांचे आकलन करावे आणि मागील मतदानाच्या दसपटीने मतदान वाढवावे,असे आवाहन सुप्रसिद्ध वक्ते व लेखक डॉ. उदय निरगुडकर यांनी केले.
येथील रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्या वतीने श्रीमती सोनेदेवी रामबिलास बाहेती सेवा केंद्र येथे ‘ विकसित महाराष्ट्र’ या विषयावर नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते. पुढे बोलताना डॉ. निरगुडकर यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या बाबींचे विश्लेषण केले आणि विकासाच्या दिशेने पावले उचलण्यासाठीच्या उपाययोजना सांगितल्या. विविध क्षेत्रांमधील सुधारणा, औद्योगिकीकरण, शिक्षण, आरोग्यसेवा, आणि शाश्वत विकास या मुद्द्यांवर भर दिला.
खरा भारत, खरा महाराष्ट्रा सर्वांसमोर यायला हवा. पण तो जाणीवपूर्वक येत नाही.कारण एकही गोळी न घालता दोन जातींमध्ये तेढ निर्माण करून काही मंडळींनी देशात युद्ध सुरू केले आहे. यातून राष्ट्रभिमान गुंडाळला जात आहे.तसेच धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली युगपुरुषांचे विकृतीकरण केले जात आहे. देशात आतापर्यंत धर्मसत्तेने जो विचार दिला. तोच राजसत्तेने अंमलात आणला. मात्र असे आदर्शच नष्ट करण्याचा प्रयत्न विशिष्ट कथ्याच्या आधारे सुरू आहे. राजकारण क्रूर आणि विसंगत होत असताना विकासाला विरोध आणि देशाच्या विरोधात डाव टाकले जात आहेत. त्यामुळे आपण विकासाला साथ देऊया.येत्या पाच वर्षात जगातील सर्वात वेगवान वाढणाऱ्या भारत देशाच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचा वाटा अव्वल असणार आहे,असा ठाम विश्वास डॉ. उदय निरगुडकर यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात नागरिकांना प्रश्न मांडले. विविध प्रश्न उपस्थित करून अनेकांनी देश राज्यातील सद्यस्थिती व विकासाबद्दलची मते मांडली. यावेळी डॉ. निरगुडकर यांनी प्रत्येक प्रश्नाला सविस्तर उत्तर देत संवाद अधिक समृद्ध केला.श्यामसुंदर मर्दा ,नेमिनाथ कोथळे, प्रकाश गौड, अजित कोरडे, शरद देसाई ,डॉ.राजेश पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत रोटरीचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी केले. पाहुण्यांची ओळख रवींद्र नाकील यांनी तर आभार सेक्रेटरी चंद्रकांत मगदूम यांनी मानले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








