जिल्ह्याचे नुतन पोलिस अधीक्षक श्री. योगेश कुमार गुप्ता यांनी घेतली गुन्हे परिषद; कायदा व सुव्यवस्थेबाबत दिल्या महत्त्वाच्या सूचना
कोल्हापूर:
जिल्ह्याचे नूतन पोलिस अधीक्षक श्री. योगेश कुमार गुप्ता यांनी आज गुन्हे परिषदेचे आयोजन करून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी यांची त्यांनी ओळख करून घेतली.
गुन्हे परिषदेच्या प्रारंभी पोलिस महानिरीक्षक साहेबांनी मुख्यमंत्री आणि पोलिस महासंचालक यांच्या सूचनांचा उल्लेख करत नव्या पोलिस अधीक्षकांना शुभेच्छा दिल्या.
पोलिस अधीक्षकांनी कोल्हापूर व इचलकरंजी शहरांसह जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला आणि वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले. यासोबतच वाहतूक कारवाईबाबत जनतेचा अभिप्राय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
पासपोर्ट व चारित्र्य पडताळणी प्रक्रियेत नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. महिलाविषयक गुन्ह्यांचा आढावा घेत पीडित बालकांना तातडीने शोधून मदत करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी, कत्तलखाने यावर लक्ष ठेवून कोणत्याही परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्याच्या सूचना दिल्या. जिल्ह्यातील प्रलंबित गुन्हे आणि अर्ज यांची तातडीने निकाली काढण्याचेही आदेश त्यांनी दिले.
महिला शाखेतील प्रलंबित गुन्ह्यांवर कारवाई, निर्भया पथकाच्या गस्तीद्वारे महिला सुरक्षेसाठी अधिक लक्ष देणे, तसेच शिकवणी वर्ग, बस स्टँड, शाळा आणि कॉलेज परिसरात सतर्कता ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.
श्री. गुप्ता यांनी जुगार, दारू व NDPS कायद्यांतर्गत होणाऱ्या गुन्ह्यांवर प्रभावी कारवाई वाढवण्याचे आदेश दिले असून, चैन स्नॅचिंगसारख्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचेही निर्देश दिले.यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील,स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे रविंद्र कळमकर यांच्यासह,उपविभागीय अधिकारी,पोलीस निरीक्षक,वाहतूक शाखा, सायबर शाखेचे पोलीस अधिकारी उपस्थित होते.
गुन्हे परिषदेत आढावा घेताना जिल्हापोलीस प्रमुख योगेश गुप्ता
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







