“आता थांबायचं नाही!” – कंत्राटी कामगारांचे आमरण उपोषण सुरू
इचलकरंजी :
महापालिका नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी संघटना समन्वय समिती, कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून इचलकरंजी येथे आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे. “आता थांबायचं नाही” अशा जोशपूर्ण घोषणांनी उपोषणाला सुरुवात करण्यात आली.
या आंदोलनात किमान वेतन कायदा, कंत्राटी कामगार कायदा १९७१, प्रा. फंड व इएसआयसी विमा कायद्यांचे पालन या प्रमुख मागण्या आहेत. संघटनेचे पुणे व कोल्हापूर विभाग अध्यक्ष प्रा. ए. बी. पाटील यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांचे स्वागत करण्यात आले.
कामगारांकडून आरोप करण्यात आला आहे की, इएसआयसी कार्ड, आरोग्य सुविधा, प्रा. फंडातील नियमितता आणि किमान वेतन याबाबतीत गेल्या आठ वर्षांपासून दुर्लक्ष होत आहे. कार्ड न मिळाल्यामुळे दोन कामगारांचा मृत्यू झाला असून, अद्यापही दुरुस्ती होत नाही. पीएफमध्ये आवश्यक तेवढी रक्कम कपात केली जात नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
प्रशासनाने केवळ कोरडी सहानुभूती व्यक्त करून पोकळ आवाहन केले असल्याचा आरोप करत कामगारांनी आंदोलन सुरू ठेवले आहे. जोपर्यंत सर्व मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत उपोषण थांबवले जाणार नाही, असा इशारा देण्यात आला.
या उपोषणात सचिन साठे, विजय कांबळे, अंकुश कुरणे, महादेव कांबळे, अभी जावळे, अजय नेतले, शक्ती गागडे, विठ्ठल कांबळे, महेश हेगडे, अमोल वासुदेव, सद्दाम देसाई व संजु निकम हे कामगार सहभागी झाले आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







