इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिन विशेष कार्यक्रमांचे आयोजन : बासरी-सारंगी जुगलबंदी व हास्य धमाका शहरवासियांसाठी आकर्षण
इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण जून महिन्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमांना शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
या अनुषंगाने छत्रपती शाहू महाराज जयंती (सामाजिक न्याय दिन) निमित्त बुधवार, दिनांक २५ जून रोजी अलायन्स हॉस्पिटल येथे सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत दिव्यांग व्यक्तींसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तर शुक्रवार, दिनांक २७ जून रोजी माई आधार केंद्र येथे सर्व नागरिकांसाठी मधुमेह व रक्तदाब तपासणीसाठी आरोग्य शिबिर होणार आहे.
Advt
वर्धापन दिनानिमित्त शनिवार, दिनांक २८ जून रोजी सायंकाळी ५ वाजता श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह येथे सुप्रसिद्ध बासरीवादक पं. विवेक सोनार व सारंगीवादक उ. साबीर खान यांच्या जुगलबंदीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर नृत्यांगना सायली होगाडे व त्यांच्या ३० महिला सहकाऱ्यांचा बॉलीवूड थीमवर नृत्यारंग सादर केला जाईल.
रविवार, दिनांक २९ जून रोजी सकाळी महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी यांची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता हास्यजत्रा या टीव्ही मालिकेतील कलाकारांच्या सहभागातून हास्य धमाका कार्यक्रम रंगणार आहे. या कार्यक्रमात अरुण कदम, श्यामसुंदर रजपूत, पृथ्वीक प्रताप, शिवाली परब, आकांक्षा कदम, माया शिंदे, सपना हेमन, अक्षता सावंत, धनश्री दळवी, सुनील जाधव आदी कलाकार सहभागी होणार आहेत.
महानगरपालिकेच्या वतीने शहरवासीयांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी या सर्व कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभागी व्हावे व या सांस्कृतिक महोत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहन आयुक्त पल्लवी पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.यावेळी अति आयुक्त सुषमा शिंदे उपस्थित होत्या.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







