सार्वजनिक सुलभ शौचालयाची मोडतोड, नागरिक संतप्त – दोषींवर कारवाईची मागणी
इचलकरंजी: ढोर गल्ली, चांदणी चौक व श्रीपाद नगर परिसरातील नागरिकांनी चांदणी चौक येथील सार्वजनिक सुलभ शौचालयाची जाणीवपूर्वक मोडतोड करणाऱ्या समाजकंटकांविरोधात महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली आहे.
नागरिकांनी सांगितले की, अपुऱ्या घरकुल जागेमुळे खाजगी शौचालय बांधणे शक्य नसल्याने या परिसरातील अनेक कुटुंबे शासकीय सुलभ शौचालयावर अवलंबून आहेत. मात्र, काही समाजकंटक शौचालय बंद करण्याचा प्रयत्न करत असून, तेथील भिंती पाडणे, पाण्याच्या टाक्या व बोअरिंगचे पाणी खाजगी वापरासाठी वापरणे, तसेच पुरुष मुतारीस बाहेरून पत्रे ठोकून बंद पाडणे अशा गंभीर प्रकारांमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
Advt
याप्रकरणी नागरिकांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले असून, ७ दिवसांत दोषींवर कारवाई न झाल्यास जाहीर पत्रकार परिषद घेऊन बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. भागातील नगरसेवक समाजकंटकांच्या बाजूने असल्याचा आरोपही नागरिकांनी केला असून, महिलांमध्ये सुरक्षिततेबाबत भीतीचे वातावरण आहे.
या प्रकारावर महापालिकेने तत्काळ लक्ष घालून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







