१० वर्षे जुन्या वस्त्रोद्योग मशिनरीसाठी अनुदानाचा मार्ग मोकळा : आमदार राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्याला यश
सामूहिक प्रोत्साहन योजना २०१३ व २०१९ अंतर्गत शासन निर्णय जाहीर
इचलकरंजी:
इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यानंतर १० वर्षांपूर्वी आयात केलेल्या जुन्या वस्त्रोद्योग मशिनरींसाठीही आता व्याज अनुदान मिळण्याचा शासन निर्णय दिनांक ७ जुलै २०२५ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. हा निर्णय वस्त्रोद्योग क्षेत्रातील अनेक उद्योजकांसाठी दिलासादायक ठरणार आहे.
पूर्वी फक्त २०१५ पूर्वी ग्रामपंचायतीच्या बांधकाम परवाना असलेल्या उद्योजकांनाच अनुदान, ५% व्याज सवलत, जीएसटी परतावा व वीज दर सवलत मिळत होती. मात्र अनेक उद्योजकांनी जुन्या मशिनरीसह उद्योग सुरू केले असून त्यांना सुद्धा प्रोत्साहन योजनांचा लाभ मिळावा, अशी मागणी होती. हे लक्षात घेत आमदार राहुल आवाडे यांनी तातडीने शासन दरबारी पाठपुरावा करून सुधारित निर्णय जाहीर करवून घेतला.
Advt
या निर्णयामुळे आता वस्त्रोद्योगाचे आधुनिकीकरण, विस्तार, तसेच नव्या गुंतवणुकीस चालना मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज दि. इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजय पाटील यांची भेट घेतली.
या भेटीत शिष्टमंडळाने शासन निर्णयामधून कोणतीही काटछाट न करता संपूर्ण लाभ मिळावा, तसेच निर्णयाच्या तारखेपासून पुढील १० वर्षांपर्यंत योजना लागू राहावी, आणि ज्यांनी अद्याप अर्ज केलेले नाहीत, अशा उद्योजकांना पुढील ३ महिन्यांची मुदत मिळावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली.
शिष्टमंडळात उपाध्यक्ष रफिक खानापूरे, संचालक राजाराम गिरी, सीए गौरव गोंदकर, सीए महेश पोतदार, सीए सुभाष चौगुले, दयानंद छप्रे यांचा समावेश होता. जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक बालाजी बिराजदार यावेळी उपस्थित होते.
फोटो-
जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजय पाटील यांना निवेदन देताना चंद्रकांत पाटील,रफिक खानापुरे व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







