अंमली पदार्थ विरोधात विशेष मोहिम राबवा – आमदार राहुल आवाडे यांची विधानसभेत जोरदार मागणी
इचलकरंजी:
वस्त्रनगरी इचलकरंजीसह परिसरात अंमली पदार्थांचे प्रमाण झपाट्याने वाढत असून युवकांसह कामगारवर्गही त्याच्या विळख्यात अडकत आहे. त्यामुळे या धोकादायक प्रवृत्तीवर वेळीच कठोर कारवाई करण्याची गरज आहे. राज्य शासनाने विशेष मोहिम राबवून ड्रग्ज तस्कर व विक्रेत्यांचे समूळ उच्चाटन करावे, अशी जोरदार मागणी आमदार राहुल आवाडे यांनी पावसाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना केली.
आमदार आवाडे म्हणाले, इचलकरंजी हे एक औद्योगिक व शैक्षणिक केंद्र असून देशभरातून कामगार व विद्यार्थी येथे वास्तव्यास असतात. मात्र, अंमली पदार्थांच्या विक्रीसाठी याच गर्दीचा गैरफायदा घेत टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. गांजा व इतर नशिले पदार्थांची खुलेआम विक्री सुरू असून पोलीस प्रशासनाकडून काही कारवाया झाल्या तरी त्याचा फारसा परिणाम दिसून येत नाही.
Advt
मागील महिन्यात गांजा विक्री प्रकरणात कोल्हापूर गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत सुमारे ३० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. परंतु अटक केलेल्या आरोपींची लगेचच सुटका झाल्याने पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे अशा प्रकरणांची पारदर्शक चौकशी होऊन मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे.
या मुद्द्यावर उत्तर देताना गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व पोलीस घटकांमध्ये अंमली पदार्थ विरोधी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आल्याचे सांगितले. तसेच ‘नार्कोड सचिवालय’ व ‘टास्क फोर्स’द्वारे ही मोहिम अधिक बळकट करण्यात येत असल्याचेही स्पष्ट केले. राज्यातील सर्व पोलीस विभागांत ड्रग्ज विरोधी कक्ष, पुणे येथे “नार्कोड सचिवालय” ची स्थापना, राज्यस्तरीय नोडल अधिकारी म्हणून विशेष पोलिस महानिरीक्षकांची नियुक्ती करणार असल्याचे आमदार आवाडे यांचा तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







