ICHMH51NEWS.IN
9921600800

क्रांतिसिंहांचा सत्यशोधक पुरोगामी दृष्टिकोन आज फार महत्त्वाचा -प्राचार्य डॉ. टी.एस.पाटील यांचे प्रतिपादन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

क्रांतिसिंहांचा सत्यशोधक पुरोगामी दृष्टिकोन आज फार महत्त्वाचा -प्राचार्य डॉ. टी.एस.पाटील यांचे प्रतिपादन

 

इचलकरंजी ता.३

क्रांतिसिंह नाना पाटील हे शेतकरी कुटुंबातील एक रांगडे व्यक्तिमत्व होते. वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा पुढे नेत त्यांनी महात्मा फुलेंचा सत्यशोधक विचार स्वीकारला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज ते महात्मा गांधी यांच्या स्वराज्याच्या व्यापक संकल्पना अंगीकारून त्यांनी स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर कालखंडात राजकारण व समाजकारण केले. प्रतिसरकारच्या माध्यमातून त्यांनी ब्रिटिश राजसत्तेला तगडे आव्हान दिले. तसेच स्वातंत्र्यानंतर संपूर्ण देशामध्ये कशा पद्धतीचे राज्य अभिप्रेत आहे हेही दाखवून दिले. त्यांच्या आचार, विचार व कृतीत जो पुरोगामी दृष्टिकोन आणि समाजवादी समाजरचनेचा आग्रह होता तो अंगीकारणे ही काळाची गरज आहे. आपल्या सत्ताकारणासाठी जात्यांधता आणि धर्मांधता यांचे हत्यार वापरणाऱ्यांशी मुकाबला करायचा असेल तर क्रांतीसिंह नाना पाटील यांचे राजकीय ,सामाजिक, आर्थिक ,सांस्कृतिक असे सर्व विचार समजून घेतले व दिले पाहिजेत असे मत ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ.टी.एस.पाटील यांनी व्यक्त केले. ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या १२५ व्या जन्मवर्षानिमित्त आयोजित व्याख्यानात ” क्रांतिसिंह नाना पाटील : व्यक्ती आणि कार्य “या विषयावर बोलत होते. समाजवादी प्रबोधिनी आणि प्रबोधन वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. राजन  मुठाणे यांनी वक्त्यांचे ग्रंथ भेट देऊन स्वागत केले. प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.

 

प्राचार्य डॉ.टी. एस. पाटील पुढे म्हणाले, भारतीय स्वातंत्र्यासाठी  महाराष्ट्रात ज्या क्रांतिकारी चळवळी झाल्या त्या चळवळीच्या इतिहासामध्ये क्रांतिसिंह नाना पाटलांचे नाव सुवर्ण अक्षराने लिहिले गेले आहे. सातारा सांगली जिल्ह्यातील शेकडो गावांमध्ये त्यांनी तब्बल चार वर्षे प्रतिसरकार चालवले. सर्वसामान्य माणसांचा नाना पाटलांच्या वर प्रचंड विश्वास होता.त्यामुळे ब्रिटिश अधिकाऱ्यांवरही त्यांचा प्रचंड दबाव होता. प्रतिसरकारची चर्चा ब्रिटिश पार्लमेंट मध्ये झाली होती.त्यावेळी साताऱ्यात ब्रिटिशांचे नाही नाना पाटलांचे राज्य आहे असे खाली मान खाली घालून निवेदन अधिकाऱ्यांना करावे लागले होते. यावरून त्यांची थोरवी लक्षात येते.

 

प्राचार्य डॉ.टी. एस .पाटील यांनी आपल्या ओघवत्या शैलीतील भाषणामध्ये क्रांतिसिंहांची व्यक्तिगत व कौटुंबिक वाटचाल, त्यांचा स्वभाव ,त्यांच्यावर ओढवलेली संकटे, तलाठ्याची नोकरी सोडून स्वातंत्र्य आंदोलनात घेतलेली उडी, त्यांचे पहाडी व्यक्तिमत्व आणि त्याची असलेली जरब, साध्यासोप्या व रांगड्या भाषेत ते करत असलेली सैद्धांतिक मांडणी, त्यातून दिसून येणारा त्यांचा प्रचंड व्यासंग, क्रांतिसिंहाना ब्रिटिशांनी. केलेल्या शिक्षा, ब्रिटिशांना त्यांनी अनेकदा दिलेली हुलकावणी, त्यांची चपळ रणनीती,प्रतिसरकारची कार्यपद्धती, स्वातंत्र्य का ,कोणासाठी आणि कशासाठी याबाबतची स्पष्ट असलेली भूमिका , स्वातंत्र्योत्तर काळातील त्यांचे राजकारण व समाजकारण, पंढरपूर व बीड येथून दोन वेळा खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर संसदेत केलेले काम आणि अखेरपर्यंत कार्यरत असलेले क्रांतिसिंह यांची विविध उदाहरणांसहित माहिती , आणि आजच्या वर्तमानात क्रांतिसिंहांच्या विचारांची अत्यावश्यकता याची मांडणी केली.

 

या व्याख्यानास जयकुमार कोले,पांडुरंग पिसे , मनोहर कांबळे,देवदत्त कुंभार, नौशाद शेडबाळे, ए.एस.दानवाडे,किरण कटके, अहमद मुजावर, संदीप चोडणकर,बजरंग लोणारी, रामदास कोळी, बापू घुले , अरुण दळवी,अमोल पाटील, रोहित तळवी भाऊसाहेब केटकाळे, युसूफ तासगावे,शिवाजी शिंदे, शहनाज मोमिन , महादेव कांबळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. सचिन पाटोळे यांनी आभार मानले.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा