घरफोडी प्रकरण उघडकीस; दोन आरोपी अटकेत, साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
इचलकरंजी:
शहापुर पोलिस ठाण्याच्या पथकाने दिवसा झालेल्या घरफोडी प्रकरणाचा पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्या कडून तब्बल ४ लाख ५१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये सोन्या–चांदीचे दागिने, मोबाईल हँडसेट तसेच चोरीवेळी वापरलेली बुलेट मोटारसायकलचा समावेश आहे.
दि. ७ सप्टेंबर रोजी हातकणंगले तालुक्यातील अष्टविनायकनगर, विवेकानंदनगर, कोरोची येथे फिर्यादी भारती सजन ढाले यांच्या बंद घराचे कुलूप उघडून कपाट व लॉकर फोडण्यात आले होते. या दरम्यान तब्बल ₹२.८६ लाख किंमतीचे सोन्या–चांदीचे दागिने चोरून नेण्यात आले होते. फिर्यादीच्या तक्रारीवरून शहापुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने तुळजाभवानी मंदिर परिसरातून एक महिला व एक इसम यांना विनानंबर बुलेटवर संशयित अवस्थेत ताब्यात घेतले. चौकशीत त्यांच्या ताब्यातून सोन्याचे दागिने, मोबाईल हँडसेट तसेच चोरीसाठी वापरलेली मोटारसायकल मिळून आली. पोलिस चौकशीत त्यांनी घरफोडीची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे दिया सचिन गायकवाड (वय २०, रा. इंदिरानगर, कोरोची) व सिद्धांत श्रीकांत सगरे (वय २४, रा. कबनूर) अशी आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक कोल्हापूर योगेशकुमार गुप्ता, अप्पर पोलिस अधीक्षक गड विभाग आण्णासाहेब जाधव व उपविभागीय पोलिस अधिकारी इचलकरंजी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सचिन सुर्यवंशी यांच्या नेतृत्वात करण्यात आली. अंमलदार अविनाश मुंगसे, अरीफ वडगावे, रोहित डावाळे, आयुब गडकरी, अर्जुन फातले, सतिश कुंभार व ज्ञानेश्वरी राख यांनी कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस नाईक अरीफ वडगावे करीत आहेत.
जप्त केलेल्या मुद्देमालासह शहापूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







