महापालिकेतील फोटो वादावर पडदा; महायुतीतील समन्वयानंतर प्रतिमा पुन्हा स्थायी समिती दालनात
इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या स्थायी समिती दालनातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार धैर्यशील माने यांच्या प्रतिमा हटविणे आणि पुन्हा लावणे या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या राजकीय वादावर अखेर पडदा पडला आहे. वरिष्ठ पातळीवरील चर्चेनंतर संबंधित नेत्यांच्या प्रतिमा पुन्हा दालनात लावण्यात आल्याने महायुतीतील तणाव निवळल्याचे चित्र दिसत आहे.
महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात सुमारे दोन महिन्यांपूर्वी सभापती सतीश मुळीक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार धैर्यशील माने यांच्या प्रतिमा लावल्या होत्या. मात्र, काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर या प्रतिमा शिवसेना शिंदे गटाच्या दबावामुळे लावण्यात आल्याचा दावा करणारे संदेश व्हायरल झाले. या घडामोडींनंतर संबंधित प्रतिमा दालनातून हटविण्यात आल्या आणि त्यावरून नवीन वादाला तोंड फुटले.
प्रतिमा हटविल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने महापालिकेवर मोर्चा काढला. माजी आमदार सुजित मिणचेकर, जिल्हाप्रमुख रविंद्र माने, शहरप्रमुख भाऊसो आवळे, युवासेनेचे शिवाजी जाधव यांच्यासह जिल्ह्यातील शिवसैनिक आणि महिला कार्यकर्त्यांनी मोर्चात सहभाग घेतला. महापौरांना निवेदन देताना वरिष्ठ नेत्यांच्या प्रतिमांचा अवमान सहन केला जाणार नाही, असा इशारा देत आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, या प्रकरणी प्रशासनाकडून स्पष्ट भूमिका समोर आली नसल्याने महायुतीतील अंतर्गत मतभेदांची चर्चा रंगू लागली होती.
या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे यांच्यात चर्चा झाल्यानंतर सर्व संबंधित नेत्यांच्या प्रतिमा पुन्हा स्थायी समिती दालनात लावण्यात आल्या.
याबाबत महापौर उदय धातूंडे यांनी सांगितले की, संबंधित प्रतिमा दोन महिन्यांपूर्वीच लावण्यात आल्या होत्या. मात्र, १९ मे रोजी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका संदेशात “दणका” असा उल्लेख करण्यात आला होता. या संदेशाबाबत जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांनी तत्काळ खुलासा करणे अपेक्षित होते. दोन दिवस कोणतीही प्रतिक्रिया न आल्याने त्या संदेशाला अप्रत्यक्ष सहमती असल्याचा समज निर्माण झाला.
“महायुती धर्म पाळत आम्ही प्रतिमा लावल्या असताना दणक्याची भाषा करणे योग्य नाही. महायुती ही सर्वांची असून ती टिकविण्याची जबाबदारी प्रत्येक घटक पक्षाची आहे,” असे धातूंडे यांनी स्पष्ट केले.
स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांनीही या प्रकरणावर भूमिका मांडताना सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार धैर्यशील माने यांच्याबद्दल आदरभाव असल्यानेच त्यांच्या प्रतिमा दालनात लावण्यात आल्या होत्या.
“महायुतीमध्ये सर्व काही सुरळीत सुरू असताना सोशल मीडियावर चुकीचा संदेश व्हायरल झाला. त्याला प्रत्युत्तर म्हणून काही काळ प्रतिमा हटविण्यात आल्या होत्या. मात्र, याचा कोणत्याही नेत्याबद्दल अनादर करण्याचा हेतू नव्हता. महायुतीत बेबनाव निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न कोणीही करू नये,” असे मुळीक यांनी म्हटले. यावेळी उपमहापौर अनिल डाळ्या, गटनेते विठ्ठल चोपडे, नगरसेवक रवी रजपूते,राजु बोंद्रे योगेश पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
महापौर उदय धातूंडेना फोटो लावण्याचे निवेदन देताना जिल्हाप्रमुख रविंद्र माने,भाऊसो आवळे व पदाधिकारी
पत्रकार परिषदेत भुमिका मांडताना महापौर उदय धातूंडे,स्थायी समिती सभापती सतीश मुळीक,उपमहापौर अनिल डाळ्या,गटनेते विठ्ठल चोपडे
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







