खर्चीवाल्या कारखानदारांनी अडवले कापडाचे टेम्पो
इचलकरंजी-
खर्चीवाल्या यंत्रमागधारकांचे मजुरीवाढीचे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत असून आज शुक्रवारी चंदूरहून इचलकरंजीकडे जाणारे कापडाचे टेम्पो अडवून धरले तर काही टेम्पोची हवा सोडण्यात आली. त्यामुळे इचलकरंजी चंदुर रस्त्यावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. जर येत्या एक-दोन दिवसात हे आंदोलन मिटले नाही तर त्याला हिंसक वळण लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सदर आंदोलनाचे नेतृत्व शहाजी भोसले, नंदकुमार लोखंडे यांनी केले.
खर्चीवाल्या यंत्रमागधारकांच्या मजुरी वाढीचे आंदोलन गेली वीस दिवस सुरू आहे. ट्रेडिंग असोसिएशन आपल्या आडमुठे भूमिकेवर ठाम राहिल्याने आंदोलन वाढत चालले आहे. बऱ्याच कारखान्यातील बिमे कापण्यात येऊन नुकसान होत आहे. प्रांतअधिकारी यांनी दोनदा बैठका बोलावूनही तोडगा न निघाल्याने यंत्रमागधारक संघटनांचे प्रतिनिधींनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मध्यस्थी करण्याची विनंती केली होती. यानुसार येत्या दोन दिवसात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. दरम्यान आज शुक्रवार असल्याने कारखान्यातील कापड ट्रेडिंग असोसिएशनकडे मोठ्या प्रमाणात जात असते. आठवडी बाजार असल्याने कामगारांचा पगार इतर व्यवहार होत असतात. हे जाणारे कापड आडवून लक्ष वेधण्यासाठी चंदूरातील कारखानदारांनी मोठ्या प्रमाणात टेम्पो रोखून धरले यावेळी काही वादावादी घडली. तर काही टेम्पोच्या चाकातील हवा सोडल्याने परिस्थिती बिघडत चालली होती. दरम्यान आमचा तुमच्याशी वाद नाही तुम्ही तुमच्या पेढीवरील ट्रेडिंग असोसिएशनच्या मालकाला सांगा असे आंदोलनकर्त्यांनी टेम्पो चालकांना बजावले. तीन चार तासांनी ते आंदोलन स्थगित करण्यात आले व शेवटी वाट मोकळी करण्यात आली.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






