आहार योग्य आणि मन शुद्ध असेल तर आरोग्य उत्तम राहील
– अमृता देशपांडे
इचलकरंजी:
आपल्या जीवनात आहार आणि मनस्वास्थ्य या दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी असून आहार योग्य असेल तर आरोग्य उत्तम राहते आणि मन शुद्ध असेल तर विचार चांगले राहतात. त्यामुळे आपण शरीर आणि मन या दोन्हींची योग्य काळजी घेतली तर आपले आयुष्य निरोगी आणि आनंदी होऊ शकते” असे प्रतिपादन पुणे येथील आहारतज्ज्ञ व मानसशास्त्र तज्ज्ञ आणि लेखिका अमृता देशपांडे यांनी केले. येथील मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमालेत दहाव्या दिवशी त्या ‘रोजचा आहार, रोजचे मानसशास्त्र’ या विषयावर बोलत होत्या.
येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फौंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलतर्फे आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत समारोपाच्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून महापालिकेचे उपमहापौर अनिल डाळ्या आणि विरोधी पक्षनेते उदयसिंह पाटील हे उपस्थित होते. सुरुवातीला त्यांच्या हस्ते छ. शिवराय प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दोघांनीही यावेळी समायोचित मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक उमेश कुलकर्णी यांनी केले तर वक्त्यांचा परिचय पद्माकर खोत यांनी करून दिला. सुत्र संचलन संतोष आबाळे यांनी केले. यावेळी समीर गोवंडे आणि घनश्याम सावलानी यांनी भेटवस्तू प्रदान करून पाहुण्यांचे स्वागत केले.
आपल्या माहितीपूर्ण व्याख्यानात भारतीय आहारपद्धतीवर भाष्य करताना देशपांडे यांनी सांगितले की, “हरित क्रांतीनंतर आपल्या आहारामध्ये कर्बोदकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे मात्र प्रथिनांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे अनेकांचे वजन वाढलेले दिसते. आपले वजन जितके किलो आहे तितकी ग्रॅम प्रथिने शरीराला मिळणे आवश्यक आहे, ती काळजी आपण घ्यायला हवी. त्याचबरोबर शरीराला फायबर पुरेशा प्रमाणात मिळण्यासाठी पालेभाज्या योग्य प्रमाणात खाणे आवश्यक आहे.”
महिलांच्या आरोग्याबद्दल बोलताना देशपांडे यांनी “भारतीय स्त्रियांमध्ये लोहाची कमतरता मोठ्या प्रमाणावर आढळते. घरच्या सर्वांचे जेवण झाल्यावर जेवणे, पालेभाज्यांचे कमी प्रमाण, यामुळे शरीरात लोह कमी होते. विशेषतः मासिक पाळीदरम्यान जास्त रक्तस्राव होणाऱ्या महिलांमध्ये ही समस्या अधिक दिसते. यावर उपाय म्हणून सर्व पालेभाज्या, नाचणी, खजूर तसेच लिंबू, आवळा, यांसारखे पदार्थ आहारात घ्यावेत. एकूणच आपला आहार संतुलित ठेवणे आवश्यक आहे.” अशा प्रकारची माहिती दिली. यावेळी भारताला ‘डायबेटिक कॅपिटल ऑफ द वर्ल्ड’ म्हटले जाते ही चिंतेची बाब असल्याचेही त्यांनी सांगितले.
मानसिक आरोग्यावर बोलताना त्यांनी जागतिक ‘हॅपिनेस इंडेक्स’चा उल्लेख केला. फिनलंड हा जगातील सर्वात आनंदी देश असून भारताचा क्रमांक ११६ वा असल्याचे त्यांनी सांगितले. हा इंडेक्स उत्तम राहण्यासाठी देशाचा चांगला जीडीपी, सामाजिक पाठबळ, आरोग्यदायी वातावरण, पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य, उदारता, भ्रष्टाचार नसणे या गोष्टी आवश्यक आहेत, असे त्या म्हणाल्या.
“आपल्या एकूण आरोग्याच्या दृष्टीने मानसिक स्वास्थ्य जपणे आवश्यक आहे आणि त्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत. कितीही मिळाले तरी समाधान नाही, भूतकाळाचा विचार करून आत्मक्लेष करून घेणे, सतत तक्रार करणे, जर तरचा विचार करीत राहणे, स्वतःला दोषी समजणे, भिडस्तपणा ठेवणे, अशा गोष्टी टाळाव्यात” असे विचार देशपांडे यांनी मांडले. “समाधानी जीवनासाठी आपण विवेकवादी राहणे आवश्यक आहे. भूतकाळात अडकून राहू नका आणि भविष्याची अनावश्यक चिंता करू नका तर वर्तमानात जगायला शिका,” असा सल्ला त्यांनी आपल्या व्याख्यानात दिला.
त्याचबरोबरीने आपल्या व्याख्यानात त्यांनी नियमित व्यायामाची आवश्यकता स्पष्ट केली तसेच ताणतणाव व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले. शेवटी श्रोत्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली. आरोग्य, आहार आणि मानसिक संतुलन यांचा सुंदर संगम घडवणाऱ्या या व्याख्यानास श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. येथील श्रद्धा इन्स्टिट्यूट हाॅलमध्ये झालेल्या कार्यक्रमास इचलकरंजी व परिसरातील रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दहाव्या दिवशी बोलताना अमृता देशपांडे
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






