आधार ब्लड बँकेला रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी एक्झिक्युटिव्हकडून अत्याधुनिक अफेरेसिस मशीन भेट
इचलकरंजी : इचलकरंजी येथील आधार ब्लड बँकेला रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी एक्झिक्युटिव्हच्या वतीने अत्याधुनिक अफेरेसिस मशीन प्रदान करण्यात आले. या मशीनमुळे एका रक्तदात्याकडून आवश्यक रक्तघटक वेगळे करून अनेक रुग्णांवर उपचार करणे शक्य होणार असून, परिसरातील रुग्णांसाठी ही महत्त्वपूर्ण आरोग्यसेवा ठरणार आहे.
अफेरेसिस मशीनच्या सहाय्याने डेंग्यू, कर्करोग, विविध रक्तविकार, अस्थिमज्जा प्रत्यारोपण करणारे रुग्ण तसेच गंभीर रक्तस्त्राव किंवा विशिष्ट रक्तघटकांची आवश्यकता असलेल्या रुग्णांना अधिक प्रभावी उपचार उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे रक्तपेढीच्या सेवाक्षमतेत मोठी भर पडणार आहे.
मशीन प्रदान समारंभाला रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७०चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इंजि. अरुण भंडारे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी असिस्टंट गव्हर्नर कमलेश लढ्ढा, रोटरी क्लबचे अध्यक्ष संतोष साधले, सचिव मयूर पाटील, खजिनदार गिरीश मोकाशी, डिस्ट्रिक्ट ॲडमिन श्रीहरी कामत, प्रायमरी कॉन्टॅक्ट गिरीश कुलकर्णी, आधार ब्लड बँकेचे अध्यक्ष सतीश मेटे, संजय टाकले, डॉ. महादेव माने, डॉ. मधुकर जाधव, डॉ. अजिंक्य घट्टे, सौ. निर्मला माने, सुहास गोरे यांच्यासह रोटरीचे पदाधिकारी, रोटेरियन्स, आधार ब्लड बँकेचा कर्मचारीवर्ग आणि जयहिंद मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
‘Service Above Self‘ या रोटरीच्या ब्रीदवाक्याला साजेसा हा समाजोपयोगी उपक्रम असून, भविष्यातही आरोग्य व समाजहितासाठी असेच नावीन्यपूर्ण प्रकल्प राबविण्याचा संकल्प यावेळी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
मशीन प्रदान करताना रोटरीचे पदाधिकारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800




