कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्यास राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट पुरस्कार जाहीर
इचलकरंजी, ता. २२
: हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्यास साखर उद्योगातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल दि शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया, नवी दिल्ली या देशातील सर्वोच्च व्यावसायिक संस्थेचा प्रतिष्ठेचा ‘सर्वोत्कृष्ट पुरस्कार’ जाहीर झाला आहे. हा पुरस्कार १९ ऑगस्ट रोजी गोवा येथे होणाऱ्या संस्थेच्या ८४ व्या वार्षिक अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
कारखान्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी दिलेले योगदान, उच्च दर्जाच्या साखरेचे उत्पादन, उत्पादन प्रक्रियेतील कार्यक्षमता आणि नाविन्यपूर्ण कार्यपद्धती यांची दखल घेऊन हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.
सन १९२५ पासून कार्यरत असलेली दि शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया ही संस्था साखर व संलग्न उद्योगांच्या विकासासाठी संशोधन, तांत्रिक मार्गदर्शन आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या प्रसाराचे कार्य करते. साखर उद्योगातील गुणवत्ता, उत्पादकता आणि स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या उद्योगसमूह, तज्ज्ञ आणि संस्थांना दरवर्षी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान केला जातो.
पुरस्काराबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना कारखान्याचे चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी सांगितले की, या सन्मानामुळे देशातील साखर उद्योगाच्या तांत्रिक प्रगतीला आणि कार्यक्षमतेला अधिक चालना मिळेल.
ज्येष्ठ संचालक प्रकाशआण्णा आवाडे आणि संचालक आमदार राहुल आवाडे यांनी या यशाचे श्रेय कारखान्याशी संलग्न ऊस उत्पादक सभासद-शेतकरी, संचालक मंडळ, ऊस तोडणी मजूर, वाहतूकदार तसेच कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी आणि कामगार यांच्या सामूहिक योगदानाला दिले. त्यांनी सर्वांचे अभिनंदन करून भविष्यातही गुणवत्ता आणि कार्यक्षमतेच्या बळावर कारखाना नवे मानदंड प्रस्थापित करेल, असा विश्वास व्यक्त केला.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





