जुने जन्म-मृत्यू दाखल्यांचे अधिकार महापालिकेकडे द्या; विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांची मागणी
इचलकरंजी, ता. २२ : जुने जन्म व मृत्यू दाखले उपलब्ध नसलेल्या प्रकरणांमध्ये नागरिकांची होत असलेली गैरसोय दूर करण्यासाठी अशा नोंदींचे डिजिटायझेशन आणि प्रमाणपत्र वितरणाचे अधिकार इचलकरंजी महानगरपालिकेकडेच वर्ग करावेत, तसेच यासंदर्भात स्पष्ट कार्यपद्धती जाहीर करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी केली आहे.
यासंदर्भात उदयसिंग पाटील, जिल्हा परिषद सदस्य कुमार कांबळे, नगरसेवक शिवाजी पाटील आणि रतन वाझे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा निबंधक (जन्म-मृत्यू), जिल्हा परिषद कोल्हापूर यांना निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाच्या निर्देशानुसार जुन्या जन्म व मृत्यू नोंदींचे डिजिटायझेशन CRS (Civil Registration System) पोर्टलवर सुरू आहे. मात्र, अनेक नागरिकांकडे पूर्वीचे जन्म किंवा मृत्यू दाखले उपलब्ध नसल्याने संबंधित नोंदी अपलोड करून मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. अनेकांनी पूर्वी दाखले काढलेले नसून काहींचे दाखले हरवले आहेत. मात्र, मूळ नोंद नोंदवहीमध्ये उपलब्ध असतानाही केवळ जुना दाखला नसल्यामुळे नवीन प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत आहे.
यामुळे नागरिकांना वारंवार शासकीय कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागत असून स्थानिक स्वराज्य संस्थांवर तक्रारींचा भडीमार होत आहे. त्यामुळे ज्या प्रकरणांमध्ये मूळ जन्म अथवा मृत्यू नोंद उपलब्ध आहे, अशा प्रकरणांमध्ये कोणती कार्यपद्धती अवलंबावी, कोणती कागदपत्रे ग्राह्य धरावीत आणि CRS पोर्टलवरील नोंदणी कशी पूर्ण करावी, याबाबत शासनाने तातडीने स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
शिष्टमंडळाने पुढे नमूद केले की, इचलकरंजीला महानगरपालिकेचा दर्जा प्राप्त झाला असून येथे आयएएस दर्जाचे आयुक्त आणि वरिष्ठ अधिकारी कार्यरत आहेत. तरीही जन्म-मृत्यू दाखल्यांची पडताळणी जिल्हा परिषदेकडे पाठविली जात असल्याने संपूर्ण जिल्ह्याचा अतिरिक्त ताण जिल्हा परिषद प्रशासनावर पडत आहे. परिणामी दाखले मिळण्यास विलंब होत असून नागरिक व प्रशासनामध्ये वादावादीचे प्रकार वाढत आहेत.
नागरिकांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास टाळण्यासाठी इचलकरंजी शहरातील जन्म-मृत्यू नोंदींचे डिजिटायझेशन, पडताळणी आणि प्रमाणपत्र वितरणाचे सर्व अधिकार इचलकरंजी महानगरपालिकेकडेच वर्ग करण्यात यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून शासनाच्या नियमांनुसार आवश्यक कार्यवाही व मार्गदर्शन करण्यात येईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
निवेदन देताना विरोधीपक्ष नेते उदयसिंग पाटील,नगरसेवक शिवाजी पाटील,रतन वाझे,जि प सदस्य कुमार कांबळे
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






