इचलकरंजीत केबल व्यावसायिकाकडे महिन्याला ५० हजारांची खंडणीची मागणी; सराईत गुन्हेगारावर गुन्हा
इचलकरंजी, ता. २२ :
जवाहरनगर परिसरात केबल व्यवसाय करण्यासाठी दरमहा ५० हजार रुपये खंडणीची मागणी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सराईत गुन्हेगाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी आकाश रमेश मेतके (वय २७, रा. शिवशंकर सायझिंग मागे, जवाहरनगर, इचलकरंजी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अभिषेक ईराप्पा तेरणे (रा. दत्तनगर, कबनूर, ता. हातकणंगले) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. २२) पहाटे सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांच्या घरासमोर आरोपीने येऊन, “तुला जवाहरनगरमध्ये केबलचा व्यवसाय करायचा असेल तर मला दरमहा ५० हजार रुपये दे. पैसे दिले नाहीस तर तुला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिली. तसेच शिवीगाळ करून दहशत निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहे. तो सध्या मोक्का (MCOCA) प्रकरणात उच्च न्यायालयातून जामिनावर बाहेर असून परिसरात त्याची दहशत असल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कौलगे करत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






