कबनूरमध्ये बेकायदा पिस्तूल, २८ जिवंत राऊंडसह तरुण ताब्यात
इचलकरंजी : कबनूर येथील दत्तनगर परिसरात बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल, २८ जिवंत राऊंड, रिकाम्या पुंगळ्या, गनपावडर तसेच पिस्तूल व काडतूस बनविण्यासाठी उपयुक्त स्टीलचे सुटे भाग असा एकूण ७४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल शिवाजीनगर पोलिसांनी जप्त केला.
या प्रकरणी तुषार लक्ष्मण येरुडकर (वय २४, रा. दत्तनगर गल्ली नं. १०, कबनूर) याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आरोपीने भाडेतत्त्वावर घेतलेल्या दत्तनगर गल्ली नं. २ येथील ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून देशी बनावटीचे पिस्टल व मॅग्झीन, २८ जिवंत राऊंड, तीन रिकाम्या पुंगळ्या, अंदाजे २५० ग्रॅम गनपावडर, पिस्टल व काडतूस सदृश्य स्टीलचे सुटे भाग तसेच सॅक आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस नाईक विशाल अंगद चौगले यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मस्कर करीत असून, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800




