इचलकरंजीत हाळवणकर गटाचे बंड थंड; स्थायी समितीतील सर्व विषय मंजूर
इचलकरंजी : गेल्या महिनाभरापासून इचलकरंजी महानगरपालिकेतील २२ कोटी रुपयांच्या घनकचरा संकलन टेंडरवरून सुरू असलेला सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत वाद अखेर स्थायी समितीच्या बैठकीत निवळल्याचे चित्र दिसून आले. आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत भाजपच्या सर्व सदस्यांनी एकत्रितपणे १२ विषयांना मंजुरी दिली.
घनकचरा संकलनाच्या टेंडरवरून हाळवणकर गटाची भूमिका आणि सत्ताधारी गटातील मतभेद यामुळे राजकीय वातावरण तापले होते. मात्र, आजच्या बैठकीत सर्व भाजप सदस्यांनी एकमताने विषय मंजूर केल्याने हाळवणकर गटाचे बंड थंड झाल्याची चर्चा महानगरपालिका वर्तुळात सुरू झाली आहे.
दरम्यान, विरोधकांनी काही विषयांना तीव्र विरोध केला. १२ कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामास मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव तसेच इचलकरंजीतील बायोमेडिकल वेस्ट व्यवस्थापनासाठी गोविंद बायोमेडिकल कंपनीच्या टेंडरला मंजुरी देण्याच्या विषयावर विरोधकांनी आक्षेप घेतला.
गोविंद बायोमेडिकल वेस्ट कंपनीच्या कामकाजाबाबत विविध ठिकाणी तक्रारी असल्याचा दावा विरोधी पक्षाने केला. कंपनीशी संबंधित २५३ बॉक्स दारू तस्करी, दोन जणांचा मृत्यू तसेच सातारा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची बनावट सही केल्याप्रकरणी गुन्हे नोंद असल्याचा आरोप परवेज गैबान यांनी बैठकीत केला. त्यामुळे याविरोधात सभा बोलवण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे शिव शाहु आघाडीच्या वतीने सांगण्यात आले.
सभेचा अजेंडा शुक्रवारी रात्री
स्थायी समितीच्या सभेचा अजेंडा शुक्रवारी रात्री मिळत असून शनिवार व रविवारी महापालिका बंद असल्याने फाईल बघायला मिळत नसल्याने सत्ताधारी मुद्दाम असे करत असल्याचा आरोप शिव शाहू विकास आघाडीकडून करण्यात आला.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






