कानाच्या दोषांवरील शस्त्रक्रिया शिबिराचे उदघाटन संपन्न
इचलकरंजी:
येथील इनरव्हील क्लब, रोटरी क्लब सेंट्रल, रोटरी क्लब हेरिटेज, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय, श्री दगडूलाल मर्दा फौंडेशन, ग्रोवेल सोलर एनर्जी प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच शालिनीताई मेघे हॉस्पिटल ॲंड रिसर्च सेंटर नागपूर व ए. ओ. आय. विदर्भ शाखा नागपूर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या कानाच्या दोषांचे रोगनिदान आणि उपचार व शस्त्रक्रिया शिबिराचा उदघाटन समारंभ इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय येथे पार पडला. नागपूर येथील अनुभवी व प्रसिद्ध डॉक्टर्स आणि सहकारी सदरच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी आले आहेत.
यावेळी उदघाटक या नात्याने बोलताना रोटरी प्रांत ३१७०चे प्रांतपाल शरद पै, बेळगाव यांनी “वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरण अशा विविध क्षेत्रात रोटरी सेवाभावी दृष्टीकोनातून कार्यरत असून या शिबिराच्या माध्यमातून ऐकू येण्यापासून वंचित असलेल्यांना ऐकायला मिळण्याचे उदात्त कार्य होणार आहे हे प्रशंसनीय आहे” अशा आशयाचे उदगार काढले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाशराव आवाडे यांनी “इचलकरंजी शहर हे आरोग्य विषयक आणि समाज उपयोगी कार्यासाठी नेहमी पुढे असून येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाच्या माध्यमातून कोरोनाकाळापासून रुग्णांना उत्तम प्रकारे सेवा दिली जाते आहे आणि या शिबिरातही तशी दिली जाईल” अशा प्रकारचे उदगार काढले.
कार्यक्रमप्रसंगी नागपूर येथील मेडिकल कॉलेजचे इएनटी विभाग प्रमुख प्रो. डॉ. देवेंद्र माहोरे यांनी शस्त्रक्रिया करणाऱ्या सर्व सर्जनच्या वतीने मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर नागपूरचे प्रसिद्ध सर्जन डॉ. भालचंद्र कोलवाडकर, रुग्णालयाच्या आरोग्य अधिकारी डॉ. भाग्यरेखा पाटील आणि डॉ. अमित सोहनी तसेच इनरव्हील प्रांत ३१७च्या एसीएम सौ. वैशाली लोखंडे, रोटरीचे सहायक प्रांतपाल यतिराज भंडारी उपस्थित होते. या सर्वांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात मर्दा फौंडेशनचे विश्वस्त श्यामसुंदर मर्दा, ग्रोवेल एनर्जीचे सी.ए. भुतडा आणि डॉ. माहोरे, डॉ. कोलवाडकर व डॉ. पाटील यांचा सत्कार शरद पै आणि आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला रोटरी क्लब सेंट्रलचे अध्यक्ष सतीश पाटील यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले तर इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ. चंदा कोठारी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रोजेक्ट कमिटी चेअरमन श्रीनिवास भुतडा यांनी सदरच्या शिबीराची सर्व माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी रोटरी क्लब हेरिटेजचे अध्यक्ष ओंकार हरिदास यांनी आभार मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय होगाडे यांनी केले. सदरच्या शिबिरात जवळपास ५०० रुग्णांची प्राथमिक तपासणी केली असून साधारणपणे ५२ रुग्णांवर विविध प्रकारच्या आणि त्यातील काही विशेष कौशल्य आवश्यक असलेल्या अशा शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात सदरचे शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
कान दोष शस्त्रक्रिया शिबिराचे उदघाटन करताना शरद पै, प्रकाशराव आवाडे आणि इतर मान्यवर व पदाधिकारी.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







