इचलकरंजी महापालिकेतील निविदांमध्ये अनियमितता? शशांक बावचकर यांचा गंभीर आरोप
इचलकरंजी:
इचलकरंजी महापालिकेतील विकास कामांच्या निविदांमध्ये होत असलेल्या अनियमिततेवर प्रकाश टाकत सामाजिक कार्यकर्ते शशांक बावचकर यांनी प्रशासनावर थेट भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. सन २०२४-२५ मध्ये नागरी दलितेतर वस्ती सुधारणा योजना अंतर्गत ४ कोटी ७९ लाख व महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना अंतर्गत २ कोटी २९ लाख रुपयांच्या विकास कामांसाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. या निविदा महापालिकेने एकत्रितपणे प्रसिद्ध केल्या असून, त्यावर बावचकर यांनी गंभीर आक्षेप घेतले आहेत.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निविदेतील कामे अंदाजपत्रकीय दरापेक्षा केवळ ०.६३ ते ०.७७ टक्क्यांनी कमी दराने मिळाली आहेत. यापूर्वीच्या निविदांमध्ये हे दर २५ ते ३० टक्क्यांनी कमी मिळत होते, ज्यामुळे महापालिकेची मोठ्या प्रमाणावर बचत होत होती. मात्र सध्याच्या निविदांमुळे लाखो रुपयांचे नुकसान होणार असल्याचा दावा बावचकर यांनी केला आहे.
बावचकर यांचा आरोप आहे की सर्व कामांची एकत्रित निविदा काढण्यामागे ठराविक ठेकेदारांनाच काम मिळावे, हा हेतू आहे.त्यांनी महापालिका आयुक्तांना यासंदर्भात २१ मार्च २०२५ रोजी पत्रही दिले होते. तसेच, कच्चा माल महाग झाला नसताना दर चढ्या का ठेवले गेले, याचे स्पष्टीकरण प्रशासनाने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
याआधीही सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या कामातील गलथानपणावरून न्यायालयाने महापालिकेची कानउघाडणी केली आहे आणि संबंधित निविदा रद्द करावी लागली आहे. त्यामुळे सध्याच्या प्रशासनावर नागरिकांचा विश्वास डळमळीत झाला आहे.
महापालिकेत सध्या महिला राज असतानाही भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी न होता उलट वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. बाहेरील अधिकाऱ्यांकडे प्रशासनाची सूत्रे असल्यानं शहराच्या विकासाबाबत त्यांना काही देणेघेणे नसल्याचे बावचकर यांनी सांगितले.
महापालिकेतील कारभार सुधारण्यासाठी आणि नागरिकांच्या पैशांचा अपव्यय टाळण्यासाठी शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







