खूप संधी असल्या तरी यशासाठी खूप कष्ट आवश्यक विवेक वेलणकर
इचलकरंजी-
“आज विद्यार्थ्यांसमोर दहावीनंतरच्या शिक्षणासाठी सायन्स, कॉमर्स व आर्टस् या सर्व विभागांत विविध प्रकारच्या, खूप संधी उपलब्ध आहेत. मात्र तुम्ही कुठेही गेलात तरी यश मिळविण्यासाठी खूप कष्ट, आवश्यक आहेत आणि त्याला पर्याय नाही, याचे भान विद्यार्थी आणि पालकांनी ठेवणे आवश्यक आहे” अशा आशयाचे उदगार प्रसिद्ध समुपदेशक विवेक वेलणकर, पुणे यांनी काढले.
‘दहावीनंतर करिअर निवडताना’ या विषयावर वेलणकर यांनी विद्यार्थी आणि पालकांसाठी अतिशय उपयुक्त असे व्याख्यान दिले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी करिअरसाठी दहावीनंतर उपलब्ध असलेल्या सर्व विभागातील कोर्सेसची माहिती दिली. त्याचबरोबर त्यांनी पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. “दहावी हा पुढील शिक्षणासाठी पाया असल्याने फिजिक्स, मॅथ्स, केमिस्ट्री अशा महत्त्वपूर्ण विषयांचा अभ्यास करताना मूळ संकल्पना निश्चित होणे आवश्यक आहे. त्याकरता विद्यार्थ्यांनी दहावीपासून अभ्यासाच्या काही सवयी लावून घ्यायला हव्यात. दररोज आपण जे काही शिकाल त्याची रोज उजळणी, सातव्या दिवशी पुन्हा आणि महिन्याच्या शेवटी आणखी एक उजळणी करायला हवी. त्याचा वर्षाच्या शेवटी अभ्यास करताना उपयोग होतो.” असे ते म्हणाले.
“दहावीचे वर्ष महत्त्वाचे असले तरी इतर काही कला, क्रीडा या क्षेत्रातील छंद असतील तर विद्यार्थ्यांनी ते बंद करू नयेत. त्याचाही उपयोग तुमच्या व्यक्तिमत्त्वासाठी होत असतो. पुढील क्षेत्र निवडताना आपल्या आवडीचा पसंतीक्रम ठरवून जे विषय सर्वात आवडीचे असतील त्या विभागात प्रवेश घेण्यासाठी प्राधान्य द्यावे. आपले मित्र, मैत्रिणी किंवा ग्रुप जात आहे त्या क्षेत्रात जाऊया असा विचार करू नका. स्वतःच्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार प्रवेश घेणे महत्त्वाचे आहे याचे भान विद्यार्थी आणि पालकांनी ठेवायला हवे” असे मार्गदर्शन वेलणकर यांनी केले. ए आय महत्त्वाचे असले तरी पुढील दहा वर्षाच्या काळात आयटीआयला देखील महत्त्व प्राप्त होणार आहे, कारण प्रत्यक्ष दुरुस्तीचे काम आयटीआय होणारेच करू शकतील, असेही मत त्यांनी मांडले.
व्याख्यानाचे शेवटी मोबाईलच्या सवयीबद्दल बोलताना वेलणकर म्हणाले “मोबाईल हा उपयोगी असला तरी तो आज ब्रह्मराक्षस होऊन विद्यार्थी व पालकांच्या मानेवर बसलेला आहे. अभ्यासाला बसताना विद्यार्थ्यांनी मोबाईल जवळ ठेवणे चुकीचे आहे. त्याचबरोबर पालकांनीही मोबाईलबाबत दक्षता घ्यायला हवी. खरे तर विद्यार्थ्याच्या अभ्यासाच्या ठराविक कालावधीत घरातील सर्वांनीच मोबाईलचा वापर करू नये. सर्वांनी दोन तास मोबाईल वापरला नाही तर कोणतेही आकाश कोसळणार नाही हे पालकांनीही लक्षात घ्यावे.” आपल्या प्रभावी व्याख्यानानंतर विद्यार्थी आणि पालकांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना वेलणकर यांनी समर्पक उत्तरे दिली.
येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल यांच्या वतीने श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात सायंकाळी हा शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सुरुवातीला समन्वयक संजय होगाडे यांनी स्वागत केले तर अध्यक्ष समीर गोवंडे यांनी प्रास्ताविक आणि शेवटी आभार व्यक्त केले. कार्यक्रमास विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800