शिक्षणाने आपल्याला ‘माणूस’ व्हायला शिकवायला हवे– माजी कुलगुरू डॉ. पांढरीपांडे
इचलकरंजी दि. १५ मे-
“आपल्या सर्वांच्याच जीवनात शिक्षण हा एक महत्त्वाचा घटक आहे पण या शिक्षणाने आपल्याला ‘माणूस’ व्हायला शिकवायला हवे. कारण इतिहास काळापासून पाहिले तर शिक्षणाने माणूस घडत जातो त्याचप्रमाणे शिकलेली माणसेही गैरव्यवहार करताना आढळतात. केवळ बंदिस्त भिंतीमध्ये दिले जाते तेच शिक्षण नसते तर त्यामुळे कसे आणि काय संस्कार होतात हेही महत्त्वाचे असते. तुम्ही किती शिकलात त्यापेक्षा कसे घडलात हे महत्त्वाचे आहे” अशा आशयाचे उदगार मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू व ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉ. विजय पांढरीपांडे यांनी काढले. येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फाउंडेशन आणि रोटरी क्लब इचलकरंजी सेंट्रल यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमालेच्या तिसऱ्या दिवशी ते बोलत होते.
शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी आणि विपुल ललित लेखन केलेले पांढरीपांडे यांनी अतिशय साध्या आणि सरळ शैलीत ‘शिक्षण… कालचे, आजचे आणि उद्याचे’ या विषयावर आपले विचार व्यक्त केले. त्यांच्या सर्व विवेचनात साधेपणा असला तरी अनुभवाची समृद्धी दिसून आली. आपल्या भाषणात त्यांनी पूर्वीपासून आजचे आणि भविष्यातील शिक्षण या सर्वांचा थोडक्यात आढावा घेतला. “काही वर्षांपूर्वी अतिशय साध्या पद्धतीने, अल्पखर्चात आणि मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन अनेक व्यक्ती घडलेल्या आहेत, यशस्वी झाल्या आहेत. पण आजचा विचार केला तर इंजीनियरिंग शिक्षणाला जितका खर्च येतो तितका खर्च प्राथमिक शिक्षणासाठी लोक करताना दिसतात. तसेच शिक्षणामुळे आपण फक्त साक्षर होत आहोत पण सुशिक्षित होत नाही याची खंत वाटते” असे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मनोरंजन मंडळाचे अध्यक्ष समीर गोवंडे आणि रोटरी क्लब सेंट्रलचे सेक्रेटरी नागेश दिवटे यांच्या हस्ते डॉ. पांढरीपांडे आणि डॉ. सौ. नीता पांढरीपांडे यांचे गुलाब पुष्प प्रदान करून स्वागत करण्यात आले. याप्रसंगी सर्वांच्या हस्ते शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी स्वागत व प्रास्ताविक संजय होगाडे यांनी केले तर वक्त्यांचा परिचय संतोष आबाळे यांनी करून दिला. पांढरीपांडे यांनी आपल्या भाषणात स्वतःचे उच्च शिक्षण आणि दीर्घ अध्यापनातून आलेले विविध संवेदनशील अनुभव सांगितले. तसेच बारावीनंतर प्रवेश घेताना आजच्या पालकांनी अमूक एक कोर्स, अमूक एक शिक्षण संस्था असा आग्रह न धरता पाल्याच्या आवडी निवडीचा आणि आपल्या एकूण क्षमतेचाही विचार करावा असे प्रतिपादन केले.
नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल बोलताना त्यांनी हे धोरण खूप चांगल्या प्रकारे तयार करण्यात आले आहे पण तितक्याच चांगल्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे अशी अपेक्षा व्यक्त केली. आपल्या शिक्षणात अनेक चांगल्या गोष्टी आहेत असे ते म्हणाले त्याचबरोबर शिक्षणातून आपण भिंती निर्माण करीत आहोत त्यापेक्षा पूल बांधायला हवेत अशीही अपेक्षा व्यक्त केली. भविष्यातील शिक्षण आणि ए आय याबद्दलही त्यांनी चांगली माहिती दिली. “आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आपल्या जीवनात आणि शिक्षण व्यवस्थेतही भरपूर बदल होतील. उद्योग, वैद्यकीय, शेती, हवामान, संरक्षण, इत्यादी अनेक क्षेत्रात फायदे होतील. मात्र आजपर्यंतच्या संशोधनातून जे अनेक शोध लागले त्याच्या किल्ल्या आपल्याच हातात होत्या आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या हातात न राहण्यामुळे धोका होऊ शकतो” असेही ते म्हणाले. व्याख्यानंतर श्रोत्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना त्यांनी चांगल्या प्रकारे उत्तरे दिली. येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात झालेल्या व्याख्यानास शहर व परिसरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
मनोरंजन व्याख्यानमालेत बोलताना माजी कुलगुरू डॉ पांढरीपांडे

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800