नागपूरच्या निष्कर्श गेडामला आर्थिक फसवणूकप्रकरणी २६ मे पर्यत पोलिस कोठडी,९३ ५० लाखांची सायबर फसवणूक; शिवाजीनगर पोलिसांकडून तपास सुरू
इचलकरंजी:
नागपूर येथील निष्कर्श सिद्धार्थ गेडाम (वय ३१) याला सायबर आर्थिक फसवणूकप्रकरणी अटक करण्यात आली असून, शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने पोलीस कोठडीसाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला २६ मे २०२५ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
सदर गुन्हा गु.र.क्र. ९८७/२०२४ अन्वये दाखल असून, आरोपींवर माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
फिर्यादी डॉ. दशावतार बडे (वय ५६, रा. इचलकरंजी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ऑनलाइन शेअर बाजारात गुंतवणूक करून मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फिर्यादीकडून एकूण ९३,५०,००० रुपये उकळण्यात आले. या व्यवहारात नागपूर येथील काही बँक खात्यांचा वापर करण्यात आला होता.
या प्रकरणातील आरोपी निष्कर्श गेडाम याच्याशी संबंधित असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांच्या मते, या रकमेतील चार लाख रुपये बंधन बँकेच्या नागपूर शाखेतील एका खात्यावर जमा करून ते चेकद्वारे काढण्यात आले आणि गेडामच्या ताब्यात देण्यात आले होते. सदर रक्कम कोठे व कोणाकडे आहे याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी न्यायालयात स्पष्ट केले.
या प्रकरणात अन्य आरोपी – रितेश वंजारी, अनिश शहा, मोहन महादेव साहू आणि दिल्ली-मुंबई येथील काही व्यक्ती व शेअर ट्रेडिंग कंपन्यांचे प्रतिनिधी यांचा सहभाग असल्याचे समोर येत आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी रक्कम हस्तांतरणाची साखळी, बँक व्यवहार आणि गुंतलेली व्यक्तींची माहिती मिळवण्यासाठी तपास करत आहेत. या आर्थिक गुन्ह्याचा व्याप मोठा असून, आणखी काही अटक होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







