आर्यचाणक्य पतसंस्थेच्या ५०० कोटीच्या ठेवी झाल्यावर मी पुन्हा येईन-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
इचलकरंजी
अर्थकारणातील सहकाराचे महत्व लक्षात घेऊन नरेंद्र मोदी सरकारने केंद्रात सहकार मंत्रालय सुरू केले आहे. चालू वर्ष हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरे केले जात असून सहकाराला नवी उभारी देण्याचे कार्य आता केंद्र आणि राज्य स्तरावर सुरु झाले आहे. श्री आर्य चाणक्य पतसंस्थेने अत्यंत उत्कृष्ट कामगिरी करून दाखविली असून त्यामुळे अन्य सहकारी संस्थाना एक चांगली प्रेरणा मिळेल आणि सहकारावरील विश्वास आणखी वृद्धिंगत होईल असे वाटते, असे प्रतिपादन मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केले. श्री आर्य चाणक्य नागरी सह पतसंस्थेच्या नवीन वास्तूच्या कोनशिला अनावरण सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते.
प्रारंभी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोनशिलेचे अनावरण केले. संस्थापक चेअरमन जवाहर छाबडा, चेअरमन राजेंद्र राशिनकर, व्हाईस चेअरमन पंकज मेहता यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी संचालिका सौ. स्वाती कुलकर्णी, सौ. मीरा हणमसागर, कर्मचारी सौ. शिल्पा कोले व सौ. पल्लवी पाटील यांनी मा. मुख्यमंत्री महोदयांचे औक्षण केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी पतसंस्थेच्या कामकाजावर समाधान व्यक्त करत शुभेच्छा दिल्या व संस्थेची माहिती मा. मुख्यमंत्री यांना करुन दिली. व्यासपीठावर खासदार धनंजय महाडिक, आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना मुख्यमंत्री मा. फडणवीस म्हणाले, पतसंस्थेची आकडेवारी पाहता ही संस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक चालवतात, हे सिद्ध होते. त्यामुळे त्याची उत्तरोत्तर प्रगती होत आहे, असे सांगून त्यांनी पतसंस्थेच्या कामकाजावर समाधान व्यक्त केले. संस्थेच्या ठेवी 500 कोटी झाल्यानंतर *मी पुन्हा येईन* असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.
यावेळी संचालक शांतिनाथ शिरगावे, अरविंद कुलकर्णी, नरोत्तम लाटा, नंदकिशोर गोधडे, सुदर्शन कदम, रामकिशोर भुतडा, कृष्णात सातपुते, मीरा हणमसागर, स्वाती कुलकर्णी, पंडित ढवळे, नरेंद्रकुमार पुरोहित, मुख्य कार्यकारी अधिकारी अमित पोवार, वैशालीताई आवाडे, दीपक राशिनकर, शशिकांत मोहिते आदींसह रा. स्व. संघाचे मुख्य पदाधिकारी व संस्थेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोनशीला अनावरण प्रसंगी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत दादा पाटील,राहुल आवाडे,सुरेश हाळवणकर,जवाहर छाबडा
मार्गदर्शन करताना देवेंद्र फडणवीस,चंद्रकांतदादा पाटील,धनंजय महाडिक,जवाहर छाबडा, राजेंद्र राशिनकर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








