अ.भा.मराठी पत्रकार परिषद पत्रकारांच्या हक्कांसाठी लढणारी संघटना- एस एम देशमुख.डिजिटल मिडिया परिषदेचा स्नेहमेळावा व ओळखपत्र वितरण उत्साहात संपन्न
कोल्हापूर:
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या संलग्न कोल्हापूर जिल्हा डिजिटल मिडिया परिषदेचा पहिलाच स्नेहमेळावा २१ जून रोजी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे अत्यंत उत्साही वातावरणात आणि मोठ्या पत्रकार सहभागात संपन्न झाला. यानिमित्ताने परिषद सदस्य पत्रकारांना अधिकृत ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. डिजिटल पत्रकारितेला संस्थात्मक मान्यता देणारा असा ऐतिहासिक क्षण ठरला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिषद प्रमुख विश्वस्त एस. एम. देशमुख सर होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, “अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ही राज्यभरातील १२,००० सदस्यांची विश्वासार्ह संघटना आहे. प्रिंट व डिजिटल अशा दोन्ही माध्यमांमध्ये कार्यरत असलेल्या पत्रकारांचे प्रश्न, हक्क,अधिकार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी आम्ही लढा दिला आहे. ही संघटना पुरस्कार विकणारी नसून पत्रकारांना न्याय देणारी आहे, हे आमचे ब्रीद आहे.”
यावेळी राज्य पत्रकार अधिस्वीकृती समिती सदस्य मा. किरण नाईक, मा. शरद पाबळे, कार्याध्यक्ष मा. शिवराजदादा काटकर, जान्हवी पाटील (मुंबई), दीपक कैतके (मुंबई विभागीय अध्यक्ष), विजय जोशी (लातूर विभाग), हरिष पाटणे (पुणे विभाग) हे मान्यवर उपस्थित होते. कोल्हापूर विभागीय सचिव चंद्रकांत क्षीरसागर, सांगली-कोल्हापूर जिल्ह्याचे पदाधिकारी, सदस्य व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष गणपती शिंदे यांनी करताना सांगितले, की “संघटनेचा विस्तार व बळकटी यासाठी आम्ही कार्यरत आहोत.” यानंतर विविध मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.
पत्रकार अनिल धुपदाळे यांनी पत्रकारांच्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
अभिजित पटवा यांनी सांगली जिल्ह्याच्या साथीने संघटना प्रिंट व डिजिटल माध्यमात बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला.
अंकुश पोळ यांनी शासनाच्या परिपत्रकात डिजिटल न्युज पोर्टलची अधिकृत नोंद व्हावी यासाठी प्रयत्न करण्याची गरज सांगितली तसेच “AI कार्यशाळा” इचलकरंजी येथे घेण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाची सुरुवात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. सर्व मान्यवरांचे वृक्ष भेट देऊन स्वागत करण्यात आले.
उपस्थित प्रमुख पत्रकारांमध्ये तानाजीराजे जाधव, कुलदीप देवताळे, अक्रम शेख, सचिन कांबळे, आराधना श्रीवास्तव, शिरीष मधाळे, मोहन शिंदे, जावेद मुल्ला, मुबारक शेख, उदयकुमार देशपांडे, रेणूताई पोवार, विकास गायकवाड, दादासो सुतार यांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी रावसाहेब यादव यांनी आभार प्रदर्शन केले. उपस्थित सर्वांनी पुढील कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आश्वासन दिले.
हा स्नेहमेळावा डिजिटल पत्रकारांसाठी ऐक्य, सन्मान आणि पुढील वाटचालीसाठी प्रेरणा ठरला. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांच्या एकजुटीने परिषद पुन्हा एकदा दमदार संघटन म्हणून उदयास आली आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800









