प्रॉपर्टी कार्ड मधील क 1 शेरा काढण्यासाठी योग्य मार्ग काढु- नगरविकास राज्य मंत्री माधुरी मिसाळ
इचलकरंजी
इचलकरंजी शहरातील बहुतांश प्रभागामध्ये नगररचना योजना 1 व 2 या दोन नगररचना 1973 साली अस्तित्वात आल्या आहेत तेव्हा पासून नागरिकांच्या प्रॉपर्टी कार्ड मधेय क 1 शेरा आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या स्वताःच्या जागेवर कोणतेच डेव्हलपमेंट करता येत नाही. बँकेचे कर्ज मिळत नाही अथवा नवीन बांधकाम करता येत नाही. त्यामुळे सदर क 1 शेरा काढणे साठी भारतीय जनता पक्षाचे इचलकरंजी शहर उपाध्यक्ष दिपक पाटील यांनी राज्याच्या नगरविकास राज्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याच्या सह पालकमंत्री सौ. माधुरी मिसाळ यांची भेट घेऊन त्याना निवेदन सादर केले असून लवकरच याबाबत संबंधित शासकीय अधिकारी यांच्या समवेत बैठक घेऊन योग्य मार्ग काढण्याचे आश्वासन मंत्री मिसाळ यांनी दिले आहे.
Advt
नगर रचना योजना शासनाकडून मंजूर होऊन 50 वर्षाहून अधिक कालावधी झालेला आहे. मालमत्ता धारकांच्या अस्तित्वात विकास बाबत वस्तुनिष्ठ मोजणी व मालकी निश्चित करण्यासाठी त्यावेळच्या इचलकरंजी नगरपरिषदेने भूमी अभिलेख विभागाकडून मोजणी करणेस मान्यता दिली होती परंतु जिल्हा भूमापन अधीक्षक यांनी मनुष्यबळ अभावी या कार्यालयाकडून मोजणी करता येणार नाही असा अहवाल सादर केला त्यामुळे तत्कालीन आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिनांक 23 मार्च 2016 रोजी नगरविकास राज्यमंत्री यांच्याकडे बैठक लावून खाजगी एजन्सी मार्फत मोजणी करण्याबाबत मंजुरी घेतली यानुसार सारथी एजन्सी पुणे यांनी जागेवर वस्तुनिष्ठ मोजणी करून 45 अभिलेख दिनांक 23 ऑगस्ट 2019 रोजी नगर भूमापन कार्यालय कडे अधिप्रमाणित करणे कामी सादर केले आहेत. परंतु खाजगी एजन्सीने तयार केलेले नकाशे अधिप्रमाणित करता येणार नाही असे मत भूमापन विभागामार्फत व्यक्त करण्यात आले. त्यामुळे सदरचे काम सन 2019 पासून प्रलंबित आहे. त्यामुळे मालमत्ता धारकांच्यामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
Advt
इचलकरंजी शहरातील विक्रमनगर, भोनेमाळ, संग्राम चौक, घोडके नगर, गोकुळ चौक, कलानगर, बंडगर माळ, आण्णा रामगोंडा शाळा परिसर, आदी बहुतांश प्रभागामध्ये नगररचना योजना 1 व 2 या दोन नगररचना अस्तित्वात आल्या आहेत. नागरिकांच्या प्रॉपर्टी कार्ड मध्ये क 1 शेरा आहे. त्यामुळे नागरिकांच्या स्वताच्या जागा असून देखील कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ या मिळकत धारकांना मिळत नाही त्यामुळे विक्रमनगर सह अनेक भागातील नागरिकांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात होत आहे.
याबाबत योग्य मार्ग काढण्यासाठी स्थानिक आजी माजी लोकप्रतिनिधी, मा. जिल्हाधिकारी, जिल्हा भूमापन अधिकारी, इचलकरंजी भूमापन अधिकारी, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त व संबंधित महापालिका अधिकारी यांच्या समवेत व्यापक बैठक घेऊन तात्काळ तोडगा काढावा या मागणी साठी भारतीय जनता पक्षाचे इचलकरंजी शहर उपाध्यक्ष दिपक पाटील यांनी राज्याच्या नगरविकास राज्य मंत्री तथा सह पालकमंत्री सौ. माधुरी मिसाळ यांना प्रत्यक्ष भेटून मागणी केली. यावेळी लवकरच याबाबत संबंधित शासकीय अधिकारी समवेत बैठक घेऊन योग्य मार्ग काढण्याचे आश्वासन मंत्री मिसाळ यांनी दिले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







