गडहिंग्लज आणि आजरा शहरांना बायपास रस्त्याची खासदार धनंजय महाडिक यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी
कोल्हापूर
– संकेश्वर ते आंबोली आणि पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा या मार्गावर सिमेंट काँक्रिटचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ एच नुकताच पूर्ण झाला आहे. या महामार्गामुळे कोकण आणि गोवा मार्गावर जाणारी वाहतूक अधिक वेगवान व सुलभ झाली आहे. मात्र हा रस्ता गडहिंग्लज आणि आजरा या दोन शहरांच्या मध्यवर्ती भागातून जात असल्यामुळे या ठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडी, धोकादायक अपघात आणि नागरी अडचणी वाढल्या आहेत.
ही गंभीर समस्या लक्षात घेऊन राज्यसभेचे खासदार श्री. धनंजय महाडिक यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नामदार नितीन गडकरी यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीत त्यांनी गडहिंग्लज आणि आजरा शहरांमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला पर्यायी बायपास रस्त्याची नितांत गरज असल्याचे निदर्शनास आणून दिले. दोन्ही शहरांमधून थेट महामार्ग जात असल्यामुळे शालेय विद्यार्थी, पादचारी, स्थानिक रहिवासी यांच्यासाठी जीवितधोका निर्माण झाला असून, अपघातांची शक्यता वाढली आहे.
खासदार महाडिक यांनी यासोबतच महामार्गालगत सेवा वाहिन्या, पथदिवे, फुटओव्हर ब्रिज, गटर्स अशा मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशीही मागणी केली आहे. गडहिंग्लज व आजरा नगरपालिकांची आर्थिक परिस्थिती मर्यादित असल्याने या कामांसाठी ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात यावा, अशी शिफारस त्यांनी केली.
या दोन्ही शहरांना वळसा घालणाऱ्या बायपास रस्त्याचा प्रस्ताव भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मुंबईतील क्षेत्रीय कार्यालयात सादर करण्यात आला आहे. याला तातडीने मंजुरी देण्याची मागणीही खासदार महाडिक यांनी केली आहे. त्यांच्या या सविस्तर सादरीकरणाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच या मागण्यांवर निर्णय घेतला जाणार असल्याचे संकेत दिले आहेत.
खासदार महाडिक यांच्या या प्रयत्नामुळे गडहिंग्लज आणि आजरा शहरांना वाहतूक सुसाट होण्यास मदत होईल तसेच नागरी सुरक्षेला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जाय आहे
मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून निवेदन देताना खासदार धनंजय महाडिक
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







