ICHMH51NEWS.IN
9921600800

माधुरी हत्तीण पुन्हा नांदणी मठात यावी यासाठी शिवसेनेची ताकद लावावी – जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांची उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

माधुरी हत्तीण पुन्हा नांदणी मठात यावी यासाठी शिवसेनेची ताकद लावावी – जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांची उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) – नांदणी (ता. शिरोळ) येथील १२०० वर्षांची परंपरा लाभलेल्या जैन मठातील श्रद्धेचे प्रतीक असलेली माधुरी हत्तीण काही दिवसांपूर्वी न्यायालयाच्या आदेशानंतर गुजरातमधील जामनगर येथील ‘वनतारा’ प्राणी संवर्धन केंद्रात हलवण्यात आली. या निर्णयामुळे कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भक्तांच्या भावना तीव्र दुखावल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांची भेट घेऊन, शिवसेना पक्षाने या प्रकरणात आपली ताकद उभी करून लोकभावनांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली.

चौगुले म्हणाले, “PETA संस्थेने न्यायालयात दिलेली माहिती एकतर्फी, अपुरी व दिशाभूल करणारी आहे. माधुरी ही केवळ एक हत्तीण नाही, ती अनेकांची श्रद्धा, परंपरा आणि अध्यात्मिक भावनांचे प्रतीक आहे. तिचे स्थलांतर हा केवळ कायदेशीर नव्हे, तर भावनिक वेदनेचा विषय आहे.”

त्यांनी यासोबतच श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगरावरील ‘सुंदर’ हत्ती, तसेच शेडबाळ मंदिरालाही आलेल्या नोटीसांचे उदाहरण देत, “ही परंपरेवरील योजनाबद्ध घाला असून जर याला वेळेत थांबवले नाही, तर पश्चिम महाराष्ट्रातील मठ-मंदिर संस्कृती धोक्यात येईल,” असा इशारा दिला.

चौगुले यांनी निवेदनाद्वारे विनंती केली की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वैयक्तिक लक्ष घालून चालू लोकसभा अधिवेशनात शिवसेनेच्या खासदारांमार्फत आवाज उठवावा. तसेच महामहीम राष्ट्रपतींकडे या संदर्भातील लोकभावना मांडाव्यात आणि सर्वोच्च न्यायालयाचा आदेश रद्द करण्यासाठी कायदेशीर प्रयत्न करावेत.

या निवेदनप्रसंगी शिवसेना नेते व मा. खासदार विनायक राऊत, आमदार सुनील प्रभू, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, सहकारी जिल्हाप्रमुख वैभव उगळे, रविकिरण इंगवले, प्रा. सुनील शिंत्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.


शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना निवेदन देताना संजय चौगुले,वैभव उगळे व इतर

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा