एमडी शूट मुळें वाढीव वीज बिलांबाबत उद्योजकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
इचलकरंजी
इचलकरंजीतील लघु व मध्यम उद्योजकांना वाढून आलेल्या वीज बिलांच्या पार्श्वभूमीवर दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनच्या सभागृहात संबंधित उद्योजकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीस यंत्रमाग, इंजिनिअरिंग तसेच इतर उद्योग क्षेत्रातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, इचलकरंजी व परिसरातील २० किलोवॅटखालील वीज ग्राहकांची बिले MD शुटमुळे KVAh प्रमाणे काढण्यात आल्याने ती तीन ते चार पटीने वाढली आहेत. या संदर्भात कोल्हापूर महावितरणच्या मुख्य अभियंत्यांशी बैठक घेऊन चर्चा करण्यात आली असून, त्यांनी दिलेल्या सूचनांनुसार उद्योजकांनी मंजूर भारापेक्षा जादा वीज वापर टाळावा, २० KWh MD व २५ KVAh MD च्या मर्यादेत वापर ठेवावा, अन्यथा वाढीव दराने बिल आकारले जाईल, असे सांगण्यात आले.
तसेच पॉवर फॅक्टर योग्य राखण्यासाठी APFC पॅनेल बसवणे, वेळोवेळी लोड तपासणी करणे व आवश्यक सर्किट ब्रेकर लावण्याचा सल्ला देण्यात आला. ज्यांची बिले जादा आली आहेत त्यांनी विहित नमुन्यात अर्ज करून नियमित बिले भरावीत. लवकरच मा. आमदार राहुल आवाडे यांच्या पुढाकाराने महावितरण व ऊर्जामंत्री यांच्याकडे बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही सांगण्यात आले.
बैठकीत ज्येष्ठ संचालक सतीश कोष्टी यांनी KWh व KVAh मधील फरक स्पष्ट केला. उद्योजकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. स्वागत उपाध्यक्ष रफिक खानापुरे यांनी केले, तर आभार संचालक पांडूरंग सोलगे यांनी मानले.
वाढीव वीज बिलसंदर्भात माहिती देताना चंद्रकांत पाटील
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







